मुंबई : दररोज कचरा गोळा करणे, वर्गीकरण आणि त्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावणे ही प्रक्रिया जिकिरीची असते. मागील काही वर्षांमध्ये महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोविड काळातही कचऱ्याचा भार कमी ठेवणे शक्य झाले; पण शहर स्वच्छ, सुंदर ठेवणे ही महापालिका आणि नागरिक अशी दोघांची जबाबदारी आहे. सलग दोन आठवडे ‘लोकमत’ने हा विषय लावून धरत जागरुकता निर्माण केली आहे. या मोहिमेतून आमच्याही काही उणिवा लक्षात आल्या, त्यात आता सुधारणा करू, अशी प्रतिक्रिया मुंबई अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी ‘लाेकमत’शी विशेष बातचीत करताना व्यक्त केली.
घनकचरा व्यवस्थापन खात्याची जबाबदारी असलेल्या काकाणी यांनी ‘यंदा कर्तव्य आहे’ या मोहिमेचा आढावा घेतला. घराघरातून ओला व सुका कचरा वेगळा झाल्यानंतर महापालिकेच्या वाहनांतून एकत्रच डम्पिंग ग्राऊंडवर जातो. याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. त्यावर, ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा उचलण्यासाठी आता तीन कप्पे असलेली नवीन वाहने घेण्यात येणार आहेत.
डम्पिंग ग्राऊंडवरील भार कमी करण्यासाठी ओल्या कचऱ्यावर मोठ्या सोसायट्यांच्या आवारातच प्रक्रिया केली जात आहे. या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सोसायट्यांना मालमत्ता करात पाच, दहा ते १५ टक्के सवलत तसेच त्यांनी तयार केलेले खत विक्रीसाठीही महापालिका बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे, अशी माहिती काकाणी यांनी दिली.