मुंबई - राजधानी मुंबई ते गोवा प्रवास क्रुझने करायला अनेकजण उत्सुक असतात. समुद्री मार्गाने पाण्यातून प्रवास करण्याची मजा काही औरच असते. मात्र, आता एसटी महामंडळाची आरामदायी बस म्हणून ओळख निर्माण केलेल्या शिवशाहीनेही मुंबई ते पणजी प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त एसटी महामंडळाकडून ही भेट देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली.
कोकणाला नयनरम्य निसर्गसौंदर्य लाभलं आहे. या सौंदर्यामुळे कोकणातील अनेक ठिकाणं पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाली आहेत. येथील अनेक कुटुंबांचा चरितार्थ पर्यटनक्षेत्रावर अवलंबून आहे. कोकणातील या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता अधिकची दळणवळण सुविधा गरजेची आहे. त्यामुळेच, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना आरामदायी भेट देण्यात आली आहे. मुंबई-गोवा मार्गावर आता ही शिवशाही धावणार आहे.
मुंबई-पणजी या मार्गावर एसटी महामंडळातर्फे उद्यापासून ‘शिवशाही’ ही एसटी सेवा सुरु होत आहे. यामुळे आता प्रवाशांना वातानुकूलित, सुखकर आणि आरामदायी प्रवास करता येईल. वाहतूक सुविधा आणि एसटी कर्मचारी यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे.
मुंबई-पणजी या मार्गावर एसटी महामंडळातर्फे उद्या शुक्रवारपासून ‘शिवशाही’ ही वातानुकूलित एसटी सेवा पुन्हा सुरु होत आहे. आता, मुंबई-पणजी हा प्रवास अवघ्या १२४५ रुपयांत करता येईल. तसेच हा प्रवास वातानुकूलित, सुखकर आणि आरामदायी होईल, याचा आनंद आहे. शिवशाही बसचे तिकीट आरक्षण एमएसआरटीसी मोबाइल अॅपवरूनही बुक करता येईल. सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र दादा चव्हाण यांनी पुढाकार घेत दळणवळण सुविधाला प्राधान्य देत, मुंबई ते गोवा महामार्ग कोकणवासियांसाठी आरामदायी प्रवासाने जोडला आहे.