मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणातील शूटर्सना लोणकर बंधूंनी पैसा पुरवल्याचे आणि लॉजिस्टिक सपोर्ट दिल्याचे आतापर्यंतच्या गुन्हे शाखेच्या तपासातून निष्पन्न झाले आहे, तसेच शुभम लोणकर यानेच शस्त्र पुरवल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. प्रवीण लोणकर याच्या पुण्यातील डेअरीत बसून सिद्दीकींची हत्या करण्याबाबत बैठका झाल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे.गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार प्रवीण लोणकर याची पुण्यात डेअरी आहे. तेथून जवळ असलेल्या भंगाराच्या दुकानात काम करणारा शिवकुमार गौतम (२४) आणि धर्मराज राधे कश्यप (२१) यांच्याशी ओळख करून घेत प्रवीण आणि शुभम यांनी त्यांना कटात सामील करून घेतले. डेअरीमध्ये त्यांच्या बैठका पार पडल्या. आरोपींच्या चौकशीतूनच लोणकर बंधूचे नाव पुढे आले आहे.
ती पोस्ट केली डिलीटघटनेनंतर हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने स्वीकारल्याची पोस्ट शुभमने प्रसारित केली होती. त्यानंतर ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. गुन्हे शाखेने शुभमच्या फेसबुक- इन्स्टावरील पोस्ट तपासली. मात्र, ती डिलीट करण्यात आली होती. ही पोस्ट त्यानेच केली का? याबाबत फेसबुक आणि इन्स्टाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर ती पोस्ट नेमकी कुठल्या अकाऊंटवरून आली हे स्पष्ट होईल, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले. लोणकर बंधूंनीच शूटर्सना पैसे पुरवले. शुभमने शस्त्र पुरवल्याचा संशय असून याबाबत तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेतील सूत्रांनी सांगितले.
अकोटच्या गुन्ह्याचे बिष्नोई कनेक्शन? -अकोट शहर पाेलिस स्टेशनमध्ये १६ जानेवारी २०२४ रोजी शुभम, प्रवीण या दाेघांसह अकाेट आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १० जणांविरुद्ध अवैध शस्त्रसाठा प्रकरणी आर्म ॲक्टसह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले हाेते.-त्यानंतर अकाेट पाेलिसांनी कारवाई केलेल्या आरोपींमध्ये शुभमलाही अटक केली हाेती. -त्याचा संपर्क थेट लाॅरेन्स बिश्नाेईच्या भावाशी असल्याचे तपासादरम्यान पुढे आले होते, असे स्थानिक पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबतही गुन्हे शाखा अधिक माहिती घेत आहे.
प्रवीण लोणकरला पोलिस कोठडी प्रवीण लोणकरला न्यायालयाने मंगळवारी, २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. महिनाभरापूर्वीच डेअरीही बंद करून लोणकर बंधू पसार झाले होते. आरोपींच्या चौकशीतून लोणकर बंधूंचे नाव समोर येताच गुन्हे शाखेने पाळत ठेवून प्रवीणला अटक केली.
जूनमध्येच सोडले अकोट-बिष्नोई गँगशी संबंध असलेल्या शुभम लोणकर आणि त्याचा भाऊ प्रवीण याचा शोध घेणाऱ्या पोलिसांना ते दोघेही घरी आढळले नाही. -त्यांचे घर बंद असल्याने शेजारी विचारपूस केली असता जून २०२४ च्या पहिल्याच आठवड्यात ते अकोट सोडून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.