मुंबई : ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो, त्या भूमीचा पुरस्कार मिळण्यापेक्षा मोठा आनंदाचा क्षण नाही. या पुरस्काराने मला मोठ्या लोकांच्या पंक्तीत नेऊन बसवले आहे. माझ्या या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला कळत नकळत कुठे ना कुठे मदत केली आहे, त्याची ही किमया आहे. या महाराष्ट्राचा प्रेक्षक अतिशय बुद्धिमान आणि खडूसही आहे. त्यांना आवडले तर ते डोक्यावर घेतात. त्यामुळे आपण जे करतो ते समोर बसलेल्या लोकांना आवडले पाहिजे. प्रेक्षकांचे हे उपकार कधीच फेडू शकणार नाही. पण, तुमचे हे प्रेम कायम मनात राहील, असे उद्गार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी काढले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
वरळी येथील डोम, एनएससीआय (नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे ५७ वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २०२३ वर्षातील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पं. सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. याखेरीज चित्रपती व्ही. शांताराम आणि राजकपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारही देण्यात आले. या सोहळ्याला केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मनीषा कायंदे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक संचालक बिभीषण चवरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि २५ लाख रुपये असे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘ए जिंदगी गले लगा ले...’ या गाण्याचा सूर छेडत सुरेश वाडकर म्हणाले की, माझी माँ स्वरसरस्वती लता मंगेशकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे यापेक्षा मोठे काय असू शकते? हा पुरस्कार स्वीकारताना खूप भावुक झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.