मुंबई : घरातील महिलेने घर तसेच घराबाहेर सर्वच कामांची जबाबदारी सांभाळावी ही समाजातील खालच्या स्तरातील कुुटुंबांची अपेक्षा आहे, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी ३० वर्षीय आरोपी व त्याच्या आईची आरोपातून मुक्तता करताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले.
घरकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या प्रियांकाचा विवाह २०१५ मध्ये प्रशांत शेलार याच्याशी झाला. विवाहानंतर एकाच महिन्यात तिने आत्महत्या केली. प्रियांकाने हे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट झालेले नाही, असे न्यायालयाने म्हटले. प्रियांकाने आत्महत्या केल्यावर तिचा नवरा प्रशांत व सासू वनितावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रियांकाला तिच्या कामाच्या ठिकाणी अनेक किलोमीटर चालत जाण्यास सासरच्यांनी भाग पाडले. तसेच तिला माहेरी संपर्क साधू देण्यात आला नाही, असा आरोप आहे. आरोपी तिच्यावर संशयही घेत असे. तिने पहाटे ५ वाजता उठून कामावर जाण्यापूर्वी घरातील सर्व कामकाज पूर्ण करणे आणि कामावरून घरी परतल्यावर सर्व कामे आटोपण्याची अपेक्षा केली जात, असे तक्रारीत म्हटले आहे.
न्यायालयाची निरीक्षणेप्रशांत व त्याच्या आईने प्रियांकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यासंदर्भात पुरावे नाहीत. सरकारी वकिलांच्या साक्षीदारांनी त्यांच्या पुराव्यात जे काही सांगितले, ते सहसा प्रियांका ज्या समाजाशी संबंधित होती, त्या समाजातील महिलांच्या दैनंदिन जीवनात घडते. कौटुंबिक घडामोडींमध्ये सासू काहीवेळा आपल्या सुनेबद्दल तक्रार करते, तेव्हा मानसिक क्रूरता आत्महत्येस कारणीभूत आहे, असे म्हटले जाऊ शकत नाही. कारण ही एक नैसर्गिक घटना आहे.अपमान, टोमणे मारणे व निर्बंध घालणे, ही कृत्ये व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करत नाहीत.
समाजातील खालच्या स्तरातील कुटुंबांना महिलांनी घर आणि बाहेरचे काम, अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणे, असे अपेक्षित असते. प्रियांका ज्या समाजाची होती, त्या समाजात कुटुंबातील महिलांनी जगण्यासाठी दुहेरी कामे करणे स्वाभाविक आहे. कुटुंब चालविण्यासाठी प्रियांका आपल्या पतीला हातभार लावत होती. - सत्र न्यायालय.