मुंबई : विधानसभेत आणि विधान भवन परिसरात गोंधळ घालणाऱ्या आणि राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारणाऱ्या आमदारांना लेखी ताकीद पाठविली जाईल आणि विधान भवन परिसरातील आमदारांच्या वर्तनावर येत्या १५ दिवसांत नियमावली जारी केली जाईल, अशी घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शनिवारी विधानसभेत केली. तत्पूर्वी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणाऱ्या आमदारांविरुद्ध नार्वेकर हे कारवाई करीत नसल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.
विरोधक सभागृहात काळ्या फिती लावूनच आले होते. जोडे मारणाऱ्या आमदारांवर तत्काळ कारवाई करण्याचा मुद्दा प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. जोडे आमच्याहीकडे आहेत मग आम्हीही ते वापरायचे का, असा सवाल करीत त्यांनी आमदारांवर कारवाईची मागणी केली. ज्येष्ठ सदस्य अशोक चव्हाण, जयंत पाटील, नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कारवाईची मागणी लावून धरली. सभागृहात काळ्या फिती लावून येणे हे नियमात बसत नाही असे अध्यक्ष नार्वेकर म्हणाले.
विधानसभेचे उपाध्यक्ष आणि विधान परिषदेच्या उपसभापतींशी चर्चा करून आपण निर्णय देऊ, असे नार्वेकर यांनी म्हणताच विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले. आताच निर्णय द्या असा धोशा त्यांनी लावला. सदस्य जागा सोडून पुढे आले. तरीही अध्यक्ष निर्णय देत नसल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, विधान भवन परिसरातील वर्तणुकीबाबतची नियमावली दिली जाईल व ती पाळली गेली नाही तर कारवाईदेखील केली जाईल.
विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका पार पडली
विरोधी पक्षनेत्यांकडे दोन पर्याय असतात पहिला गडबड, गोंधळ घालून सभागृह बंद पाडायचे आणि दुसरा चर्चा करायची आणि सरकारकडून उत्तरे घ्यायची. कुठल्याही विरोधी पक्षनेत्याने सुरुवातीला थोडा गडबड - गोंधळ करायचा असतो आणि नंतर चर्चा करायची असते. त्यांनी त्यांची भूमिका पार पाडली. महाराष्ट्राची परंपरा आहे इथे कुणी कुणाचे शत्रू नाहीत, शत्रूची परंपरा इथे नाही.
थोरातांची तयारी अन् मुख्यमंत्र्यांचा इशारा
विधानभवनच्या पायऱ्यांवर जोडे मारण्यात आले. त्यात दोषी असलेल्यांवरच नाही तर सभागृहात गोंधळ घालणाऱ्या आमच्या बाजूच्या सदस्यांवरही कारवाई करा, त्यासाठी आमची तयारी आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले. तरीही अध्यक्ष कारवाई करत नसल्याने विरोधक अधिक आक्रमक झाले. विरोधक सभात्याग करत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेचे समर्थन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाटेल तसे बोलणे सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.