मुंबई- आज महाविकास आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीला आता महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला अधिकृत निमंत्रण दिले आहे. आज या बैठकीत जागावाटपाटी चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत एक पत्र महाविकास आघाडीने वंचितला दिले आहे.
"महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक असून दिनांक २५ जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत 'वंचित' आघाडीने सहभागी व्हावे, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे',असं या पत्रात म्हटले आहे.
महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक
महाविकास आघाडीची आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार असून जागावाटपाबाबतही चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत. तर दुसरीकडे आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीला बैठकीला निमंत्रण दिल्याचा दावा केला होता तर वंचितकडून असं कोणतही निमंत्रण आले नसल्याचे सांगितले होते. आता महाविकास आघाडीने अधिकृत सह्यांचे पत्र वंचितला दिले आहे. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडी या बैठकील उपस्थित राहणार का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.