मुंबई- आज देशात मोठ्या उत्साहात दसरा साजरा केला जातो. राज्यात दसऱ्यानिमित्त राजकीय मेळाव्याचेही जोरदार आयोजन केलं जात. आज मु्ंबईत शिवसेना ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही मेळावा होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामनामधून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा? ठाकरे, शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, निवडणुकीचे रणशिंग फुंकणार
दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे. दसरा मेळाव्यानिमित्त आगामी लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुकांचे रणशिंगच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फुंकले जाणार आहे. दरम्यान, सामनातून शिंदे-फडणवीस, पवार सरकारसह मोदी-शाह यांच्यावरही टीका केली आहे. 'दसरा हा मंगलमय सण, पण महाराष्ट्राचे अमंगल करणारे एक बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकार शिवरायांच्या महाराष्ट्रावर मोदी–शहांनी लादले आहे. सत्तेचा माज व अहंकार अशाच पद्धतीने रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी दसऱ्याच्या दिवशी झाला',असा टोला या लेखातून लगावला आहे.
'शिवतीर्थावर ‘राम–लीला’ साजरी होईल. अहंकारी रावणाचे दहन होईल, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल व भारत देश सूडाच्या फासातून मुक्त होईल. महाराष्ट्राच्या जनतेने अहंकाराचा कोथळा काढण्यासाठी ‘वाघनखे’ चढवली आहेत. आजच्या दसऱ्याचे हेच महत्त्व आहे, असंही या लेखात म्हटले आहे.
पंचवटीत राजकीय आशीर्वादाने ‘ड्रग्ज’
"रावणाकडे सोन्याच्या विटा म्हणजे सोन्याचे खोके होते. ते खोकेही त्याला वाचवू शकले नाहीत हेच खरे दसऱ्याचे महत्त्व आहे, असा टोलाही लगावला आहे. आज महाराष्ट्रात दसरा साजरा होत असताना राज्याची स्थिती काय आहे? श्रीराम नाशकातील पंचवटीत वास्तव्यास होते. रामस्पर्शाने ती भूमी पवित्र झाली, पण त्या पंचवटीत आज राजकीय आशीर्वादाने ‘ड्रग्ज’ म्हणजे अमली पदार्थांचा मोठा व्यापार चालतो. गेल्या काही महिन्यांपासून ‘पंचवटी’ या नशेच्या व्यापाराने बदनाम झाली, अग्रलेखात असा आरोपही केला आहे.
'शिवसेना तोडली गेली, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला गेला व मिंध्या-लाचार बुळचटांच्या हाती महाराष्ट्र सोपवून भाजपने नवी फडणविशी सुरू केली, अशी टाकाही फडणवीस यांच्यावर केली आहे.
शिवरायांच्या नावाने घोटाळा
'आता म्हणे, छत्रपती शिवरायांची ‘वाघनखे’ तीन वर्षांच्या कंत्राटावर, भाडेतत्त्वावर इंग्लंड येथून आणली जात आहेत. इतिहासकार व शिवरायांच्या वंशजांच्या मनात या ‘वाघनखां’विषयी शंका आहेत, पण काही कोटी रुपये जनतेच्या तिजोरीतून खर्च करून ही वाघनखे आणली जात आहेत. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी शिवरायांची आज्ञा होती, पण येथे वाघनखांवर शिवरायांच्या नावाने कोटय़वधी रुपये लंडनमधील एका म्युझियमला दिले. शिवरायांच्या नावाने केलेला हा घोटाळा आहे, असा आरोपही यात केला आहे.