मलबार हिल जलाशयाची टाकी सध्या तरी सुस्थितीत; तज्ज्ञांनी जलाशयाबाबत नोंदवली निरीक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 09:46 AM2023-12-19T09:46:11+5:302023-12-19T09:46:19+5:30
महानगरपालिकेतर्फे मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मलबार हिल जलशयाची टाकी ही सध्या तरी सुस्थितीत आहे असून, काही ठिकाणांवर जिथे गळती दिसून आली तिथे टाकीची दुरुस्ती किंवा डागडुजी करणे शक्य आहे. मलबार हिल जलाशय पुनर्बांधणी संदर्भात नियुक्त करण्यात आलेली तज्ज्ञ समितीने जलाशयाचा १ ए , १ बी आणि १ सी कप्पा रिक्त करून जलाशयांतर्गत पाहणी आहे. या २ तासांच्या पाहणीदरम्यान समितीमधील दोन तज्ज्ञ सदस्यांनी जलाशयाच्या स्थितीबाबत ही निरीक्षणे नोंदवली आहेत.
महानगरपालिकेतर्फे मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आयआयटी पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ, नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून या आधी दि. ७ डिसेंबर रोजी जलाशयाच्या एका कप्प्याची पाहणी करण्यात आली होती आणि आता जलाशयाच्या दुसऱ्या कप्प्यांची पाहणी करण्यात आली आहे. ही पाहणी सकाळी ८ ते १०च्या दरम्यान पूर्ण झाली. व्यवसायाने स्ट्रक्चरल अभियंता आणि तज्ज्ञ समितीच्या सदस्या असलेल्या अल्पा शाह यांनी जलाशयाची टाकी चांगल्या स्थितीत असून, काही दुरुस्त्या आणि डागडुजी अपेक्षित असल्याचे मत नोंदविले.
पाणी उकळून प्यावे
शहर विभागात काही परिसरांत १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. त्यामध्ये चर्चगेट, कुलाबा, गिरगाव, ताडदेव, ग्रॅन्ट रोड या विभागांचा समावेश होता. काही विभागांतील नागरिकांना एक दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागातील नागरिकांना एक दिवस (२४ तास) गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिकेने केली आहे.
१४९ सूचना मलबार हिल जलाशयासाठी
मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी जी कार्यपद्धती स्वीकारली जाणार आहे याबाबत नागरिकांनी व तज्ज्ञांनी त्यांच्या सूचना पालिकेला कळवाव्यात, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते.
१५ दिवसांत पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाकडे १४९ सूचना आणि हरकती सादर झाल्या आहेत. ही समिती या सूचना आणि हरकतींचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यात येणार आहे.