बोरिवलीत मालकाच्या १७७ तोळे सोन्यावर डल्ला मारून मॅनेजर पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 05:33 PM2023-07-13T17:33:09+5:302023-07-13T17:35:46+5:30
बोरिवली परिसरात राहणारे जतिन ललीत धोरडा (३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते चेतन सोनी यांच्यासोबत भागीदारीत जीपी ज्वेलर्स अंतर्गत दागिने बनविण्याचा व्यवसाय करतात.
मुंबई : मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत मॅनेजर ९७ लाख ४७ हजार किंमतीच्या १७७ तोळे सोन्यावर डल्ला मारून पसार झाल्याची घटना बोरीवलीत समोर आली आहे. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
बोरिवली परिसरात राहणारे जतिन ललीत धोरडा (३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते चेतन सोनी यांच्यासोबत भागीदारीत जीपी ज्वेलर्स अंतर्गत दागिने बनविण्याचा व्यवसाय करतात. जी. पी. ज्वेलर्स मध्ये हितेश सोनी हा २०१३ पासून मॅनेजर म्हणून कामाला होता. व्यापाऱ्या कडून आलेले सोन्याचे बार ताब्यात आल्यानंतर ते विश्वासाने हितेश च्या ताब्यात देण्यात येत होते. पुढे, हितेश कडून ते कारागिरांकडे दागिने बनविण्यासाठी देण्यात येत होते. १६ मार्च रोजी प्रदर्शन असल्याने जतीन यांनी शिल्लक स्टॉक तपासला असता, त्यात फरक दिसून आला. हितेशकडे जाब विचारत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने, विश्वासाचा गैरफायदा घेत ४ जानेवारी ते १६ मार्च दरम्यान त्यांच्याकडील सोन्याच्या रॉ मटेरिअल मधून १,७७२ ग्रॅम वजनाच्या ९७ लाख ४९ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. थोडे थोडे करत ते चोरी करून स्वतच्या फायद्यासाठी वापरले.
हितेश याने वारंवार वेळ मागून दागिने परत करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर, २५ मार्च पासून तो गायब झाला. मोबाईलही बंद केल्याने तो पसार झाल्याचे स्पष्ट झाले. अखेर, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहे.