"माझ्या अंत:करणातील मराठा भावांनी खूप अभ्यास करावा, मोठ-मोठ्या पदांवर जावं"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 11:13 AM2023-10-29T11:13:00+5:302023-10-29T11:14:48+5:30
मराठा समाजातील आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंच्या विधानाविरुद्ध आणि मराठा समाजाच्या भावना भडकावणाचा आरोप करत त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली होती.
मुंबई - राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले असून मराठा आरक्षण हेच माझ्यावरील औषध असल्याचं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे समाजातील तरुणांच्या भावना तीव्र होत आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणारे आणि हे कायदेशीररित्या शक्य नसल्याचं सांगणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीतीला विषय नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, मराठा समाजातील भावांनी खुल्या प्रवर्गातून मोठ्या पदावर स्थान मिळवावं, असा सल्लाही त्यांनी दिलाय.
मराठा समाजातील आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंच्या विधानाविरुद्ध आणि मराठा समाजाच्या भावना भडकावणाचा आरोप करत त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर, जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणीही सदावर्ते यांनी केली. त्यामुळे, गुणरत्न सदावर्ते आणि मराठा समाजातील युवक हा वाद चिघखळा होता. त्यावर, प्रतिक्रिया देताना सदावर्तेंनी आमच्यात कुठलाच वाद नसल्याचे स्पष्ट केले. हे राजकीय डावपेच आहेत, जे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडून होत आहेत, असेही सदावर्तेंनी म्हटलं.
मराठा माझ्या भावांनी, मराठा माझा श्वास असलेल्या माझ्या भावांनी, जे सगळे माझ्या अंत:करणातील आहेत. त्यांनी खूप अभ्यास करावा, खुल्या वर्गातील जागांवर मोठ-मोठ्या पदावर जावं. पण, मागासवर्गीय होण्याच्या आणि मागासवर्गीय म्हणून जात शोधण्याच्या भानगडीत पडू नये, असे विधान अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलंय. वसईत एका लग्नसमारंभात गेल्यानंतर पत्रकारांनी सदावर्तेंना प्रश्न विचारले होते. त्यावेळी, ते बोलत होते.
उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांनीच हा वाद सुरू केला आहे. काँग्रेसवाले सत्तेत नसल्यावर असं काहीतरी करत राहतात. आमच्यात हा कुठलाही वाद नसून आरक्षणाचा हा राजकीय डाव होता, हे पुढील काळात मराठा बांधव समजून घेतली, आमच्यात कुठलाही वाद नाही, असे स्पष्टीकरणही सदावर्तेंनी दिलं.