Join us

शिवसेना अन् संभाजी ब्रिगेडच्या युतीला मराठा सेवा संघाचाही पाठिंबा; सत्ता येण्यासाठी प्रयत्न करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 12:18 PM

शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीला मराठा सेवा संघाचाही पाठिंबा दिला आहे.

मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी लागणारी युती झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच या युतीची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीला संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असलेल्या मराठा सेवा संघानेही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

शिवसेनेला सत्तेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. याचपार्श्वभूमीवर मराठा सेवा संघात मोठे फेरबदल करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. मराठा सेवा संघाने पुर्नगठन करुन राज्यात आता जी नवीन युती झालीय, ती समवैचारिक संघटनेची युती आहे. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची राज्यात सत्ता येण्यासाठी पूरक वातावरण मराठा सेवा संघ करेल. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे संस्थापक अर्जुन तनपुरे यांनी सांगितले.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी देखील भाष्य केलं आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात झालेल्या युतीचे मी स्वागत करतो. ही युती लवकरच राज्यात वेगळं वळण देईल. सर्व निवडणूका एकत्र लढणार. किमान समान कार्यक्रम राबवून आगामी काळात आमचे नेते वाटाघाटी करतील, असं पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं आहे.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत प्रादेशिक आणि इतर विरोधी पक्षांना संपवण्याची भाषा सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी आणि शिवप्रेमातून शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती झाल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. शिवसेना आाणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येऊन पुढची वाटचाल करावी. महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घ्यावेत. शेतकरी, आदिवासी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी एकत्र काम करावे, अशी इच्छा संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडने २०१६ मध्ये शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रावरून, त्या दैनिकाच्या कार्यालयावर हल्ला चढवला होता. पुढच्याच वर्षी संभाजी ब्रिगेडने शिवसेना भवनावरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र काढून टाकण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसैनिकांना तिथे खडा पहारा द्यावा लागला होता. अर्थात उभय पक्षांच्या धुरिणांनी आता त्या मतभेदांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. काही बाबतीत आमचे मतभेद आहेत; मात्र आम्ही चर्चेतून त्यावर मार्ग काढू, शेवटी उभय संघटना शिवप्रेमी आहेत, अशी भूमिका दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामध्ये त्यांना कितपत यश मिळेल, या प्रश्नाच्या उत्तरासाठी काही काळ नक्कीच प्रतीक्षा करावी लागेल.

'दूध का दूध, पानी का पानी' दिसेल- मंत्री गुलाबराव पाटील

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचं काम सुरु केलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील बैठका घेतायत, आमचीही कामे सुरु आहेत. भाजपाही तयारी करतेय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये त्यांची लोक कामे करताय, पण शेवटी घोडामैदान दूर नाहीय. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५-६ महिन्यात होती. त्यामध्ये 'दूध का दूध, पानी का पानी' दिसेल, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनासंभाजी ब्रिगेड