Join us  

मोर्चा 'मातोश्री १ ते मोतीश्री २' पर्यंत काढला पाहिजे होता, CM शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 6:21 PM

ठाकरे गटाला आमदार मनिषा कायंदे यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे

मुंबई - बृह्लमुंबई मनपाच्या मुख्यालयावर ठाकरे गटानं आयोजित केलेल्या धडक मोर्चाला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे. "खोके सरकारकडून मुंबई ताब्यात घेण्यासाठी माजी नगरसेवक फोडले जात आहेत. त्यासाठी आता आयपीएस अधिकाऱ्यांकडून फोन केले जात आहेत. याचे काही रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहेत. लवकरच ते उघड करेन", असा गौप्यस्फोटच आदित्य ठाकरेंनी केला. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने मोर्चा काढत शिंदे-फडणवीस सरकावर निशाणा साधला आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चावर टीका करताना ठाकरेंना लक्ष्य केलंय.

ठाकरे गटाला आमदार मनिषा कायंदे यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा गळ्यात घातला. यावेळी, राहुल कनाल यांचे वडिल डॉ. कनाल हेही उपस्थित होते, तसेच राहुल यांचे शेकडो कार्यकर्तेही हजर होते. राहुल कनालची ओळख ही त्याच्या कामामुळे आहे, कोविड काळात रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्यांपैकी राहुल होता, तो घरात बसून नव्हता, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात बीएमसीवर निघालेल्या मोर्चावरही टीका केली.  आम्ही महायुतीच्यावतीने आक्रोश मोर्चा काढणार होतो. पण, बुलढाणा येथे घडलेल्या घटनेनंतर आम्ही तो मोर्चा स्थगित केला. ज्यांना संवेदना नाहीत, ज्यांना राजकारण करायचंय त्यांना ते करु द्या. पण, खरंतर आजचा मोर्चा चुकीच्या ठिकाणाहून काढला आहे. हा मोर्चा, मातोश्री एक ते मातोश्री २ असा काढायला पाहिजे होता. कारण, सगळं तिथंच झालंय ना, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. सगळं त्यांनाच माहिती आहे, चोराच्या उलट्या बोंबा. ईडीची चौकशी सुरू झाल्यानंतरच हे मोर्चा काढतायंत, असेही शिंदेनी म्हटले. कोविड काळात सगळं बोगस काम केलंय, कहर म्हणजे पीपीई कीट, मृतदेहासाठीच्या बॅगची किंमत ६०० रुपये असताना ती ६५०० रुपयांना घेतली, असे सांगत मोठा भ्रष्टाचार कोविड काळात झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

आदित्य ठाकरेंचे मित्र 

राहुल कनाल हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आहेत. राहुल कनाल आणि आदित्य ठाकरे यांची मैत्री सर्वश्रृत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये पटेनासे झाले आहे. आमच्या मैत्रीत कोणी तरी भांडणं लावून देत असल्याची प्रतिक्रिया कनाल यांनी दिली होती. कनाल हे युवा सेनेचं काम पाहायचे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात अस्वस्थ होते. त्यामुळेच, त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे

"पहिला घोटाळा म्हणजे रस्त्यांचा घोटाळा होता. तो सर्वांना कळला पाहिजे. कारण तुमच्या आमच्या सर्वांच्या पैशांचा गैरवापर झाला आहे. तुम्ही निवेदन वगैरे देणार आहात का असं मला विचारतात. मी म्हणालो चोरांना काय निवेदन द्यायचे. तुम्ही जी चोरी केलीय ती आमच्या नजरेत आलीय, ज्या दिवशी आमचे सरकार आले त्या दिवशी पोलीस आणि आम्ही आत घुसणार आणि अटक करणार. लक्षात ठेवा", असा उघड इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेआदित्य ठाकरेउद्धव ठाकरे