मुंबई :
दहीहंडी आणि गणेशोत्सवादरम्यान करण्यात आलेल्या सजावटींमध्ये मोठ्या प्रमाणावर मोरपिसांचा वापर होत असून, ही मोरपिसे दादर मार्केटपासून कोणत्याही सिग्नलवर सहजरीत्या २० रुपयांना उपलब्ध होत आहेत. मात्र, बाजारात विक्रीसाठी आणण्यात आलेली मोरपिसे मोरांना मारून विक्रीसाठी आणण्यात आली आहेत की मोरांची गळून पडलेली पिसे बाजारात विक्रीसाठी आणण्यात आली आहेत ?
याचा ठावठिकाणा लागत नाही. परिणामी मोरांच्या पिसांच्या विक्रीचा ‘बाजार’ ऐन उत्सवात उठला असून, यातून कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचा कयास पक्षिमित्रांनी बांधला आहे.
वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये गळून पडलेले मोराचे पंख गोळा केले तर ते अडचण राहत नाही. मात्र, मोराला मारून त्याचे पंख गोळा करणे हा गुन्हा आहे. कोट्यवधी लोकांच्या घरी मोरपिसे असतात. मुळात जंगलात जाण्यास परवानगी नाही. दहीहंडी आणि गणेशोत्सवात मोराचे पंख बाजारपेठांत अधिकच्या संख्येने विकण्यासाठी येतात, अशी माहिती रॉ या प्राणी, पक्षीमित्र संघटनेचे संस्थापक पवन शर्मा यांनी दिली.
दोन ते चार महिन्यांत मोराचे दोन ते चार पंख गळून पडतात. एका मोराच्या शिकारीतून सुमारे दीडशे ते दोनशे पंख मिळतात. मोराचा पंख ओढून काढला आहे की गळून पडला आहे, हे पाहण्याचीही एक पध्दत आहे. बाजारात उपलब्ध असलेली पिसे जबरदस्ती ओढून काढलेली आहेत, असे दिसते. आसपासच्या जिल्ह्यातून, राज्यांतून मोराचे पंख बाजारात येतात. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा येथून मोराचे पंख बाजारात येतात. महाराष्ट्रातूनही बाहेरच्या राज्यात जातात.
एका मोरपिसाची किंमत अंदाजे २० रुपये असते.
९० टक्के विक्रेत्यांकडे प्रमाणपत्र नाही विक्री करणाऱ्यांना वन विभाग ताब्यात घेतो. हे पंख विकण्यासाठी प्रमाणपत्राची गरज लागते. प्रमाणपत्रातून हे मोरपीस गोळा करून आणले आहेत याकडे लक्ष वेधले जाते. मात्र, ९० टक्के लोकांकडे हे प्रमाणपत्र नसते. हे प्रमाणपत्र वनविभाग देते. जंगलात मिळणारी मोरपंख वन विभागात जमा केल्यानंतर वनविभाग नाहरकत प्रमाणपत्र देते. मात्र, हे नियम पाळले जात नाहीत. पोलिसांनी कारवाई करायची म्हटले तरी याची विक्री करणारे लोक पळ काढतात. तक्रार दाखल झाली तर वनविभाग कारवाई करते. कोट्यवधींची उलाढाल या क्षेत्रात होते. सजावटीच्या प्रत्येक क्षेत्रात मोरपिसांचा वापर होतो.