मुंबई : ‘मनी एज’ घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार राजीव जाधव देशाबाहेर पसार झाला आहे. या फसवणूक प्रकरणाचा आकडा ७० कोटींवर गेला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी गुन्हे शाखेच्या कक्ष ७ मध्ये यावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत फसवणुकीचा आकडा ७० कोटींच्या पुढे पोहोचला आहे. फसवणूक झालेल्यांच्या तक्रारी नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे. यासाठी स्वतंत्र टीम काम करत आहे.
जवळपास ४०० हून अधिक गुंतवणूकदार तक्रार करण्यासाठी पुढे आले आहेत. आरोपींनी वायदे बाजार आणि बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले होते. कंपनीच्या माध्यमातून पैसे गुंतवल्यास महिना दोन टक्के दराने परताव्याचे प्रलोभन दाखवत गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढण्यात आले.
आरोपी राजीव म्हणाला, बाहेर जातो, पैसे घेऊन येतो
राजीव जाधवने गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुंतवणूकदारांना परदेशात जात असल्याचे सांगितले. तेथे जाऊन जवळपास १५० कोटींची मालमत्ता विकून पैसे परत करण्याचे आश्वासनही त्याने दिल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतर त्याचा कुणाशीही संपर्क झाला नसल्याचे समजते.
ती माहिती चुकीची...
तक्रारींचा ओघ अचानक कमी झाल्याने अधिकाऱ्यांनी गुंतवणूकदारांकडे विचारणा केली. तक्रारी देण्यासाठी ३१ जानेवारी शेवटची तारीख होती, अशी माहिती सोशल मीडियावरून मिळाल्याने ते पुढे येत नसल्याचे अधिकाऱ्यांना समजले. तक्रारदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.