मुंबईतील कोळीवाडा गावठाणच्या सिमांकनाच्या प्रलंबित विषया संदर्भात बैठक संपन्न
By मनोहर कुंभेजकर | Published: October 26, 2023 08:50 PM2023-10-26T20:50:25+5:302023-10-26T20:50:39+5:30
बैठकीत मुंबई शहर व उपनगरामध्ये कोळीवाड्यांच्या साठी गावठाण व विस्तारित गावठाण यांच्या सिमांकनाचा मुद्दा घेण्यात आला.
मुंबई-मुंबईतील कोळीवाडा गावठाणच्या सिमांकनाच्या प्रलंबित विषया संदर्भात मुख्यमंत्र्यांचे अप्पर प्रधान सचिव भूषण गगरानी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने त्यांच्या आज सायंकाळी ५ वाजता बैठक पार पडली
बैठकीत मुंबई शहर व उपनगरामध्ये कोळीवाड्यांच्या साठी गावठाण व विस्तारित गावठाण यांच्या सिमांकनाचा मुद्दा घेण्यात आला. कोळीवाडा गावठाण व विस्तारित कोळीवाडा गावठाण यांचे कमाल चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करण्याचा शासन निर्णय प्रस्तावित करण्याचा व विकास आराखड्यात तत्संबंधी बदलाव करून प्रत्यक्ष कोळीवाडा गावठाण यांचे निरीक्षण करून नगर विकास विभागाचे अप्पर प्रधान सचिवअसिम गुप्ता साहेब यांच्या समवेत सादर करण्याचे ठरले.
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या समवेत वरील संदर्भात चर्चे दरम्यान कोळीवाडा गावठाण मधील वापरातील वहिवाटेतील घरांना मार्गदर्शक तत्वा अंतर्गत नियमित करण्यात येतील.पण त्याकरिता त्या त्या कोळीवाडा गावठाण येथील नियमावलीतील विनिमय व विकास नियंत्रण नियमावलीच्या कायद्याअंतर्गत नियमित करण्याचे ठरविण्यात येईल.
कोळीवाडा गावठाण व त्यातील विस्तारित क्षेत्र याचे अंतिम सर्वेक्षण महसूल विभागाच्या अंतिम मंजुरी साठी पाठविण्याचे ठरले. यामुळे सर्व कोळीवाडे, गावठाण व आदिवासी पाडे संरक्षित होऊन त्यांच्या वापरातील जागांवर अतिक्रमण होणार नाही अशी मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात येऊन त्याची प्रत झोपडपट्टी प्राधिकरण, जिल्हाधिकारी शहर व उपनगर तसेच बृहन्मुंबई महानगर पालिकेला सादर करावी असे निर्णयाअंति ठरले. कोळीवाडा गावठाण मधील असलेल्या दोष दुरूस्ती अहवाला संबंधित प्रत्येक कोळीवाडा गावठाणातील नियुक्त सदस्य आपले अहवाल शासनास व कोळीवाडा गावठाण समितीस सादर करतील व त्यावर उचित कारवाई केली जाईल.
बैठकीत खासदार राहुल शेवाळे व अप्पर प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी पुढाकार घेऊन संबंधित विषय निर्णयास्तव नेल्याबद्दल बैठकीत उपस्थित असलेल्या कोळीवाडा गावठाण समितीच्या नियुक्त सदस्य उज्ज्वला पाटील, पंकज जोशी, वेदांत काटकर, राजेश मांगेला, गिरीश साळगांवकर यांनी शासनाच्या सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले.