मुंबई: जी-२० प्रतिनिधींना महाराष्ट्राचा समृद्ध वारसा आणि परंपरा दाखविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या परिसरात करण्यात आले. परदेशी प्रतिनिधींनी देखील या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जी-२० साठी मुंबईत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गिरगाव चौपाटीवर ढोल ताशांच्या गजरात आणि लावणी, कोळी गीतांनी करण्यात आले. यामुळे भारावून गेलेल्या या पाहुण्यांनी स्वतः नृत्यात सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. या नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जी-२० परिषदेला मंगळवारपासून मुंबईत प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्राचा संपन्न वारसा, संस्कृती, परंपरा आणि प्रगतीची माहिती याबरोबरच राज्यातील सांस्कृतिक कलेची ओळख जी-२० परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींना व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
जी-२० परिषदेसाठी मुंबईत आलेल्या प्रतिनिधींचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर फेटे बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गेट वे ऑफ इंडियाजवळ विशेष लाईट शोचे आयोजन करण्यात आले होते. पुणेरी ढोल पथक, गीत-संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले
मुंबईत १३ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या जी-२० विकास कार्यगटाच्या बैठकांना मंगळवारी सुरुवात होत असून, विविध कार्यक्रम होणार आहेत. पहिल्या सत्रात सकाळी ९.३० ते दुपारी एक या कालावधीत ‘डाटा फॉर डेव्हलपमेंट : रोल ऑफ जी २० इन ॲडव्हान्सिंग द २०३० अजेंडा’ या विषयावर बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटरच्या जास्मिन सभागृहात कार्यक्रम होतील.
सध्याच्या काळात जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण केवळ एकत्र काम करण्यानेच शक्य आहे. आमच्या प्राधान्यक्रमांमध्ये केवळ जी-२० सदस्यांच्याच आकांक्षाचा समावेश नसून, जगाच्या दक्षिणेकडील देशांच्या आकांक्षांचाही समावेश असल्याचे जी २० चे शेर्पा अमिताभ कांत यांनी माध्यमांना सांगितले. भारताच्या विकास कार्यगटाच्या प्राधान्यक्रमांचा आराखडा कांत यांनी यावेळी सादर केला. यात हवामानविषयक कृती आणि अर्थसहाय्यासह न्याय्य ऊर्जा संक्रमण आणि ‘लाईफ’ (पर्यावरणपूरक जीवनशैली), शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना गती देणे आणि डिजिटल सार्वजनिक सामग्री/विकासाकरिता डेटा यांचा समावेश आहे.