लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भक्तिगीत, भावगीत, गौळण, कोळीगीत आणि लावणीसह एक से बढकर एक बहारदार गाण्यांनी दिंडोशी विधानसभेच्या मालाड पूर्व कुरार व्हिलेज,आप्पापाडय़ात अंध-दिव्यांगांची भक्तिगीत, भावगीत, गौळण, कोळीगीत, लावणी यांच्या संगीतमय मैफीलीने दिवाळी पहाट सुरेल झाली.अंध-दिव्यांगांच्या कलेने रसिक जणू भारावले.
दृष्टीहीन कलाकारांचा सहभाग असलेला हा दिवाळीमय पहाटचा कार्यक्रमात तुषार कांबळे यांनी बासरी वादन तर सूत्रसंचलन बुद्धकोष कासारे यांनी केले. तबला सचिन पाटील, कीबोर्ड अजय पानवलकर, ऑक्टोपॅड राहुल गजेल यांनी संगीत साथ दिली. तर आकाश रामाने, आफताब ठाकूर, निकेत म्हात्रे, श्रद्धा घुगे, रामचंद्र पाटील, अखिलेश पाल, अरबाजे यांनी गायन सादर केले. संघर्ष क्रीडा मंडळ व नव अरुणोदय सेवा मंडळाने या सोहळय़ाचे आयोजन केले. यावेळी अंध-दिव्यांग आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक शिवसेना आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी उपस्थिती लावली.
दिवाळी सण म्हटला की, जल्लोष, उत्साह, आनंद आणि गोडधोड असेच समीकरण आहे. मात्र अंध-दिव्यांगांना खऱया अर्थाने अशा सणांचा आनंद घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर कुरार व्हिलेज आप्पापाडा प्रथमेश नगर येथे ‘तेज प्रभात’ या जल्लोषपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष आहे.एकीकडे दिवाळी असल्याने सर्व जण आपल्या कुटुंबासोबत, कार्यक्रमांत असताना आमदार सुनील प्रभू यांनीही प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली व कलाकारांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाला शिवसेनेकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल अंध-दिव्यांग बांधवांनी आभार मानले. यावेळी परिसरातील नागरिकही मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आमदार सुनील प्रभू यांचा सत्कार प्रथमेश सहकारी गृहनिर्माण संस्थेचे खजिनदार सुभाष चव्हाण यांनी केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तानाजी महाडीक, माजी उपमहापौर अँड. सुहास वाडकर, माजी नगरसेवक आत्माराम चाचे, विभागसंघटक विष्णू सावंत, शाखाप्रमुख विजय गावडे, माजी शाखाप्रमुख प्रमोद पालांडे, प्रदीप निकम आदी उपस्थित होते.