Join us  

एकतेचा संदेश घराघरात पोहोचवायला हवा; इफ्तार पार्टीतून शरद पवारांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 10:49 PM

असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. ही देशासाठी चांगली गोष्ट नाही असं पवारांनी सांगितले. 

मुंबई - आज देशात वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एकतेचा संदेश घराघरात पोहोचवायला हवा. संविधान आणि कायदा आणि सुव्यवस्थेने देश चालतो. मात्र सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी संविधान आणि कायदा सुव्यवस्थेपासून दूर राहून पावले उचलण्याची सवय लावली तर आपण चुकीच्या मार्गावर जाऊ असं सांगत खासदार शरद पवार यांनी सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

राष्ट्रवादीकडून मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्यात पवार बोलत होते, शरद पवार म्हणाले की, गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व सहकारी मुंबईतील इस्लामिक जिमखान्यात इफ्तारसाठी जमतात आणि शांतता, सलोखा आणि बंधुभाव राखण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील त्यासाठी वातावरण कसे पोषक राहील याचा विचार करतात. समाजात चुकीची कामे करणाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था आहे. मात्र येथे कायदा व सुव्यवस्था आणि संविधान दूर ठेवून कायदा हातात घेऊन काही पावले उचलल्याची चर्चा होते. असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. ही देशासाठी चांगली गोष्ट नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच पण मला सर्वांना खात्री द्यायची आहे की, राज्यघटना किंवा कायदेशीर व्यवस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण सहकार्य आणि ताकद देण्यास कधीही मागे हटणार नाही. मुंबई शहरातील पदाधिकाऱ्यांनी सर्वांना येथे आमंत्रित केले आणि त्यांना इफ्तारला उपस्थित राहण्याची संधी दिली. त्या सर्वांचे मी आभार मानतो, मला आनंद आहे असंही शरद पवारांनी म्हटलं. 

देशात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्नदरम्यान, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. जिथे आम्ही सर्वजण इफ्तार पार्टीसाठी आलो आहोत. दिवाळी असो किंवा रमजान, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्व एकाच ठिकाणी येतात आणि एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करतात. या भावनेची देशात सर्वाधिक गरज आहे. निवडणुका जवळ आल्यावर काही लोक आपापसात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू ठेवणार आहे. आपण सर्वजण भारतात राहणारे भाऊ-बहीण आहोत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. जिथे सर्व धर्म हे शिकवतात की स्वतःच्या धर्माबरोबरच इतर धर्मांचाही आदर करा आणि बंधुभाव वाढतो. आजच्या इफ्तार पार्टीतून आपल्याला संदेश घ्यायचा आहे की आपण सर्वजण या देशाची शांतता, बंधुता टिकवून ठेवण्यासाठी एकत्र काम करू आणि सर्वांवर प्रेम करत राहू असं आवाहन राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी केले.  

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार