आली लहर, थंडीने केला कहर, महाराष्ट्र गारठला; मुंबई-ठाण्यात आल्हाददायक वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 07:42 AM2023-01-10T07:42:24+5:302023-01-10T07:42:37+5:30
मुंबईत तापमानाचा किमान पारा १९ अंशावर होता. मुंबई-ठाण्यात आल्हाददायक वातावरण आहे.
मुंबई : उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीसह दाट धुके पडले असून राज्यातील बहुतांश शहरांतही किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. त्यामुळे महाराष्ट्र गारठला आहे. मात्र मुंबई आणि ठाण्यात अजूनही म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव येथे ५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईत तापमानाचा किमान पारा १९ अंशावर होता. मुंबई-ठाण्यात आल्हाददायक वातावरण आहे.
मुंबईसह राज्यभरातील बदलत्या हवामानाबाबत अधिक माहिती देताना भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, येत्या ४८ तासांत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, जिल्ह्यांतील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात थंडीच्या लाटेची दाट शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांसह विदर्भातील काही भागातही थंडीच्या लाटेची शक्यता आहे.
इशारा : दोन दिवसांत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांसह विदर्भात थंडीच्या लाटेची शक्यता.
कुठे एक अंकी तापमान? (अंश सेल्सिअस)
जळगाव ५
औरंगाबाद ५.७
गोंदिया ७
उस्मानाबाद ८.५
यवतमाळ ८.५
नागपूर ८.५
पुणे ८.६
नाशिक ८.७
परभणी ९.५
बारामती ९.६
गडचिरोली ९.६
अमरावती ९.९
वर्धा ९.९
पारा विशीवर
मुंबई १९.४
ठाणे २१
येथेही
थंडी
बुलडाणा १०
चंद्रपूर १०
नांदेड १०.२
उदगीर १०.३
अकोला १०.४
जालना ११
महाबळेश्वर ११.१
वाशिम ११.८
सातारा ११.९
सोलापूर १२
मालेगाव १२.४
सांगली १३.१
कोल्हापूर १५
माथेरान १६.२