मुंबई - ऑक्टोबर हीटने त्रासलेल्या मुंबईकरांना आज अखेर थंडीने दिलासा दिला. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, या हंगामातले आतापर्यंतचे हे नीचांकी किमान तापमान आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईतली गुलाबी थंडी कायम राहणार असून, वाढत्या थंडीमुळे मुंबईकरांनी किमान रात्री तरी पंखे, कूलर आणि एसीचा वापर कमी केला आहे. दरम्यान, दिवसा मुंबईकरांना उन्हाचे चटके बसतच असून, रात्री पहाटे पडणारा गारठा मुंबईकरांना आल्हादायक वातावरणाचा अनुभव देत आहे.
ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून तापमानात दिवसेंदिवस सातत्याने घसरण होत आहे. परिणामी, थंडीचा कडाका वाढत आहे. वातावरणात गारठा जाणवत असल्याने ठेवणीतील उबदार वस्त्रे बाहेर निघाली आहेत. दरम्यान, पालघर जिल्ह्यात मंगळवारी कमाल २९ अंश, तर किमान २३ अंश सेल्सियस तापमान होते.
सर्दी-खोकल्याच्या रुग्णांत वाढ
यंदा पावसाळ्यात अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता अधिक आहे. थंडीमुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी आदी आजारात वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस थंडी चांगलीच वाढणार आहे. परिणामी, हिवाळ्यात त्वचा कठोर होणे, त्वचा कोरडी पडणे, ओठ फाटणे, पायांच्या टाचांना भेगा पडणे, अशा समस्या उद्भवतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला वैद्यकीय देत आहेत.
उत्तर पश्चिमेकडून वाहणारे थंड वारे राज्यासह मुंबईकडे वाहत आहेत. त्यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमान १६ ते १७ अंश राहील. - सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
सध्या जाणवत असलेले थंडीचे सातत्य अजूनही पुढील पाच दिवस म्हणजे, १ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. सध्या मुंबईसह कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान २८, तर पहाटेचे किमान तापमान १२ दरम्यान आहे. ही दोन्ही तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी घट झाली आहेत. मुंबईसह कोकणातील कमाल तापमान ३० तर किमान तापमान १४ च्या आसपास आहे. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
माथेरान थंडीने गारठले
माथेरान - रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील माथेरानमध्ये कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस तर, किमान तापमानाचा पारा १८.४ अंश पर्यंत घसरला. मुंबई, ठाणे आदी मोठ्या शहरातील नागरिकांनी या गारेगार हवेचा आनंद घेण्यासाठी माथेरानकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे हे शहर गर्दीने फुलले आहे. येत्या शनिवार आणि रविवार ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे.