मुंबई - भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या हल्ल्यानंतर राज्यातील भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. एकीकडे महापुरुषांची बदनामी होत असल्यावरुन शिवप्रेमी संघटना आणि बहुजन समाजातील तरुणांनी रस्त्यावर उतरुन निषेध नोंदवला आहे. तर, दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने भाजपही आक्रमक झाली असून शाईफेक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यावरुन राज्यातील राजकीय वर्तुळातही पडसाद उमटत आहेत. राजकीय नेतेही या घटनांवर आपलं मत मांडत असताना शिवसेनेनंही मुखपत्रातून चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप आणि सत्ताधारी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.
हे असं का बोलतात या मथळ्याखाली शिवसेनेनं मुखपत्रातून भाजप नेत्यांवर प्रहार केला. तसेच, कर्मवीर भाऊराव पाटील आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी कशारितीने शाळा सुरू केल्या, याची माहितीही शिवसेनेनं दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते इतक्या बेतालपणे का बोलत आहेत? कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट व शाप त्यांना लागलेत का? नपेक्षा शिकल्या-सवरलेल्या माणसांच्या डोक्यावर असा परिणाम झालाच नसता. चंद्रकांत पाटील हे तर राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. शिक्षणमंत्री म्हणून त्यांना भिकेचे डोहाळे लागले आहेत व तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे. चंद्रकांत पाटील यांनी आता दिलगिरी व्यक्त करून माघार घेतली. तरीही शाईफेकीचा हल्ला त्यांच्यावर झाला. महाराष्ट्रात महापुरुषांच्या बदनामीचा 'जिहाद' सरकारने पुकारला आहे काय? 'लव्ह जिहाद'विरुद्ध कायदा महाराष्ट्र सरकार बनवत आहे. त्याआधी शिवराय, फुले, आंबेडकरांच्या विरोधात वळवळणाऱ्या जिभांना आवर घालणारा कायदा करा, अशी मागणीच शिवसेनेनं
कामाख्या देवीच्या पूजा केल्यापासून भाजप पुढाऱ्यांची डोकी भरकटली
महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी येथे शाईफेक करण्यात आली. अशा घटनांचे समर्थन करता येणार नाही, पण शेवटी जे पेरले तेच उगवताना दिसत आहे. पाटील यांनी डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासंदर्भात एक विधान केले. त्यातून हा शाईफेकीचा स्फोट झाला, पण महाराष्ट्रातील एक वर्ग वेगळेच सांगतो आहे. मिंधे गटाचे आमदार गुवाहाटी येथे कामाख्या देवीची वेगळ्या पद्धतीने पूजाअर्चा करून आले. तेथे तंत्र, मंत्र, करणी वगैरे प्रकार केले जात असल्याची वदंता आहे. मिंधे गटाच्या लोकांनी मंदिरात जाऊन नक्की काय केले ते त्यांनाच माहीत, पण तेव्हापासून महाराष्ट्रातील भाजप मंत्री व पुढाऱ्यांची डोकी साफ भरकटून गेली आहेत. ते वेड्यासारखे बरळू लागले आहेत. मिंधे गटाने नक्की कोणाच्या विरोधात जारण-मारण केले असा प्रश्न त्यामुळे महाराष्ट्राला पडला आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटातील आमदारांवरही निशाणा साधला.
मंत्री देसाई यांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना धमकी द्यावी
मिंधे गटाचे मंत्री शंभू देसाई यांनी संजय राऊत यांना सरळ धमकी दिली की, 'तुम्ही परखड बोलणे थांबवले नाही, तर पुन्हा तुरुंगात टाकू.' श्री. शंभू देसाई यांनी ही दमबाजी चंद्रकांत पाटील, शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल, भाजपचे आमदार यांच्यासारख्यांना केली पाहिजे. आंबेडकर, फुले, कर्मवीर पाटील यांना भिकारी म्हणणाऱ्यांना व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू, असे हे शंभू देसाई का गर्जत नाहीत? हा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते इतक्या बेतालपणे का बोलत आहेत? कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट व शाप त्यांना लागलेत का?