मुंबई - राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप घडल्याचं दिसून आले. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बहुतांश आमदार फुटल्याने पक्षाला धक्का बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व विचारांशी तडजोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला. शिंदे गटात शिवसेनेचे खंदे शिलेदार एक-एक करुन सामिल होत आहे. गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, दादा भुसे यांच्यासारखे कट्टर शिवसैनिक शिंदे गटाला मिळाले आहेत. त्यामुळे, शिंदे गटाची ताकद वाढली असून आता आमदार दिलीप लांडे हेही शिंदे गटात सामिल झाले आहेत. शिंदे गटातील शिवसेनेच्या बंडखोर १२ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने गुरुवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. शिवसेनेने बोलाविलेल्या बैठकीला हे सदस्य उपस्थित नसल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर आज आणखी चार आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. आमदार सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर आणि रमेश बोरनारे यांच्या विरोधात देखील शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. एकीकडे शिससेनेनं कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली असताना आमदार एकनाथ शिंदेच्या गटात सामिल होत आहेत.
आमदार दिलीप लांडे हे आज सकाळी गुवाहटीतील हॉटेल रेडिसन्स ब्लू येथे दाखल झाले. यावेळी, त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला. हात उंचावतच त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, तिथं उपस्थित शिवसेनेच्या आमदारांना जादू की झप्पी दिली. गळाभेट, हस्तांदोलन आणि फोटोसेशनही केलं. विशेष म्हणजे आदल्यादिवशीच लांडे यांनी मी कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. ''मी महाराष्ट्रातच आहे, उद्धव ठाकरेंसोबत सुखी आहे, उद्धव ठाकरेंसोबतच राहणार'' असल्याचं लांडे यांनी म्हटलं होतं. माझ्या गुवाहटीत जाण्याबद्दलच्या बातम्या केवळ तुम्हीच पसरवत आहात, पण मी इथेच आहे, असे लांडे यांनी म्हटलं होतं. मात्र, आज ते शिंदे गटात सामिल झाले आहेत. दरम्यान, दिलीप लांडे चांदिवली मतदारसंघाचे आमदार आहेत.
शिवसेनेत दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करूनही एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत शिवसेनेचे ३८ आमदार तर ६ अपक्ष मिळून ४३ आमदारांचे पाठबळ शिंदेंना आहे. तर दुसरीकडे वर्षा बंगला सोडण्याची घोषणा करत उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याच दिवशी सकाळी आमदारांची बैठक वर्षावर बोलावली. या बंगल्यात शिवसेनेचे १५ आमदार उपस्थित होते. तर इतर ३ लवकरच पोहोचतील असा दावा करण्यात येत आहे.