Join us

मेट्रो कामा दरम्यान निर्माण झालेल्या समस्यां वरून आमदारांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

By धीरज परब | Published: June 06, 2023 9:11 PM

मीरा भाईंदर मेट्रोच्या कामाचा आढावा आणि पावसाळ्या आधी मेट्रो कामा मुळे रस्ते , नाले , उघडे चेम्बर, खड्डे आदी निर्माण झालेल्या समस्यांची पाहणी आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी मंगळवारी केली .

मीरारोड  - मीरा भाईंदर मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान ठिकठिकाणी रस्ते - गटारांची झालेली दुरावस्था पाहून त्या बाबतची कामे पावसाळ्या आधी येत्या ४ दिवसात पूर्ण केली नाहीत तर एमएमआरडीए आयुक्तां कडे तक्रार करणार असल्याची तंबी देत शहरातील दोन्ही आमदारांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले .   

मीरा भाईंदर मेट्रोच्या कामाचा आढावा आणि पावसाळ्या आधी मेट्रो कामा मुळे रस्ते , नाले , उघडे चेम्बर, खड्डे आदी निर्माण झालेल्या समस्यांची पाहणी आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी मंगळवारी केली . यावेळी महापालिका आयुक्त दिलीप ढोले , शहर अभियंता दीपक खांबित , एमएमआरडीचे मेट्रो कामे संचालक प्रमोद अहुजा , मुख्य अभियंता मधुकर खरात , मेट्रो कामाच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील , सुब्रतो अधिकारी , प्रकल्प व्यवस्थापक नितिन देशमुख आदी उपस्थित होते . दहिसर चेकनाका पासून भाईंदर पूर्वेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौक पर्यंत मेट्रो कामाची पाहणी केली गेली . 

मेट्रोचे काम गेले ३ वर्षे सुरु असल्याने अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. यामुळे अपघात होत आहेत. मेट्रोच्या कामाचे साहित्य , डेब्रिज रस्त्याच्या कडेला पडून आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बेराकेटिंग करावे , वाहतुकीला अडथळा ठरणारे डेब्रिज व साहित्य हटवावे, गटारांच्या चेम्बर वर झाकणे बसवावीत , रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत अशा सूचना आ. सरनाईक यांनी केल्या.  वादळी पावसाची शक्यता पाहता हि कामे लवकर झाली नाहीत तर परिस्थिती बिकट होईल अशी भीती आ . जैन यांनी बोलून दाखवली . 

एमएमआरडीएच्या संथ कारभारावर नाराजी व्यक्त करून येत्या ४ दिवसात सगळी कामे पूर्ण झाली नाही तर एमएमआरडीए आयुक्तां कडे तक्रार करू अशी तंबी अधिकाऱ्यांना दोन्ही आमदारांनी दिली . येत्या शनिवारी पुन्हा झालेल्या  कामाचा पाहणी दौरा करू  . आयुक्तांशी मीरा भाईंदर मेट्रो कामाबाबत चर्चा केली असून पुढील आठवड्यात मेट्रो कामातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी व कामे लवकर पूर्ण करण्यासाठी मुंबईत बैठक घेणार आहोत.  मीरा भाईंदर मेट्रो मार्ग उत्तन पर्यंत नेण्याचा निर्णय झाला असून कारशेड डोंगरी येथे करण्याबाबत कारशेडच्या नव्या जागे बद्दल तांत्रिक टीम काम करीत आहे .  शासन निर्णय आल्यानंतर कार शेडचे काम हि सुरु होईल असे आ . सरनाईक म्हणाले. 

टॅग्स :मुंबईमीरा रोड