Mumbai Crime : मुंबईच्या दादर स्थानकावर बॅगेत मृतदेह सापडल्यासून रेल्वे पोलीस यंत्रणा आणखी सजग झाली आहे. अशातच बोरीवली स्थानकावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोरिवली रेल्वे पोलिसांनी २४ वर्षीय मॉडेलला रेल्वे स्टेशन पुलावर ट्रॉली बॅगमध्ये विना परवाना पिस्तूल आणि १४ काडतुसे नेत असताना अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मॉडेलला ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.
बोरीवली स्थानकावर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) २४ वर्षीय अभय कुमार उमेश कुमार झा नावाच्या मॉडेलला शुक्रवारी बॅगेत १४ जिवंत काडतुसांसह विदेशी पिस्तूल घेऊन जाताना अटक केली. अभय कुमारला मॉडेलला सतर्क असलेल्या सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलने पकडले. पोलिसांनी अभय कुमारला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता बोरिवली रेल्वे स्टेशनच्या पुलावर गस्त घालणाऱ्या एका कॉन्स्टेबलने ट्रॉली बॅग घेऊन जाणाऱ्या अभय कुमारला अडवले. अभय कुमारने पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि बॅग उघडून दाखवण्यास सांगितले. मात्र अभयने बॅग उघडण्यास नकार दिला.
त्यानंतर कॉन्स्टेबलने अभय कुमारला जीआरपी स्थानकात आणले आणि त्याची बॅग तपासली. बॅगेत पोलिसांना'मेड इन इटली ऑटो पिस्तूल' आणि १४ जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी सगळ्या वस्तू जप्त केल्या आणि अभय कुमारला अटक केली. आरोपीकडे बॅगेत विदेशी बनावटीचे ७.६५ एमएमचे पिस्तूल आणि १४ जिवंत गोळ्या सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अभय कुमार हा मूळचा बिहारमधील बराईचक पाटम गावचा रहिवासी असून तो मीरा रोड येथे राहून मॉडेलिंगची छोटी मोठी कामे करत होता. त्याने कोणत्याही परवान्याशिवाय अवैधरित्या पिस्तूल स्वतः जवळ ठेवले होते. जीआरपीने आरोपी अभय कुमारला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. पुढील तपासासाठी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
“आम्ही शस्त्रास्त्र कायदा, १९५९ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. प्रथमदर्शनी असे दिसते की त्याने फक्त छाप पाडण्यायासाठी पिस्तूल मुंबईत आणले. मात्र, त्याला पोलीस कोठडी मिळाली असून, त्याची अधिक चौकशी करणार आहोत. यामागे टोळीचा हात असण्याचीही शक्यता आहे किंवा तो कुणाला शस्त्र पुरवणार होता का याचा तपास केला जाणार आहे,” असे बोरिवली जीआरपीच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.