Join us

दीर्घकाळ संघर्ष करत त्यांनी राजकारण उभं केलं; राज ठाकरेंकडून मुलायम सिंह यांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 2:45 PM

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील मुलायम सिंह यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

Mulayam Singh Yadav Death: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना २ ऑक्टोबर रोजी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत नाजूक होती आणि कोणतीही सुधारणा झाली नाही. 'सपा'चे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांनी आपल्या कुटुंबासाठी मोठा राजकीय वारसा मागे सोडला आहे.

मुलायम यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुलायम सिंहांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं असून १९९७ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशमधील जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते. मुलायम सिंह यांच्या निधानानंतर देशातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी देखील मुलायम सिंह यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, ज्येष्ठ समाजवादी नेते मुलायमसिंग यादव ह्यांचं आज निधन झालं. डॉ. राममनोहर लोहिया ह्यांच्याकडून प्रेरणा घेत, उत्तर भारतात समाजवादाचा विस्तार करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये मुलायमसिंग ह्यांचं नाव घ्यावं लागेल. प्रस्थापितांच्याविरोधात दीर्घकाळ संघर्ष करत त्यांनी आपलं राजकारण उभं केलं. उत्तर भारतात एका विशिष्ट वर्गाची सत्तेतील मक्तेदारी मोडून काढत, सत्तेचे लाभ हे समाजातील इतर वर्गांपर्यंत पोहचवण्यात मुलायमसिंग यादव ह्यांचं नक्कीच मोठं योगदान आहे. संसदीय राजकारणात आणि जमिनीवरच्या राजकारणात मुलायमसिंग यादव ह्यांनी केलेली कामगिरी ही नक्कीच मोठी आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे ९ जुलै २०२२ रोजी निधन झाले होते. त्यांना रक्तदाबासह मधुमेहाचा त्रास सुद्धा होता. साधना गुप्ता या मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्या औरैया येथील विधुना येथील रहिवासी होत्या. १९८० मध्ये त्यांची पहिल्यांदा मुलायम सिंह यादव यांच्यासोबत भेट झाली होती. साधना गुप्ता यांचेही यापूर्वी लग्न झाले होते. पण, त्या आपल्या पतीसोबत जास्त काळ राहिल्या नाहीत आणि चार वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता. ज्यानंतर साधना गुप्ता आणि मुलायम सिंह यादव यांचे लग्न झाले. साधना गुप्ता या मुलायम सिंह यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान होत्या.

टॅग्स :मुलायम सिंह यादवराज ठाकरेमनसेसमाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय)