मुंबई: राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Session) उद्या म्हणजेच १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मुंबई विधानभवन येथे हे अधिवेशन पार पडेल. १७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत अधिवेशनाचं कामकाज होणार असून यानिमित्ताने पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत.
आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ५ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.
अधिवेशनच्या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात येतील आणि या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य असणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक २०,२१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.या बैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्व जण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले. मंत्रालयात भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. दीपांकर दत्ता, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. तातेड, मंत्रालयातील विविध विभागांचे सचिव आदी मान्यवर उपस्थित होते. शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.