अद्याप आरे चेक नाक्यावरील ‘छत्रपती शिवाजी महाराज’ प्रवेशद्वाराच्या कामावरील स्थगिती उठवलीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 05:16 PM2023-05-18T17:16:42+5:302023-05-18T17:17:12+5:30

मंत्र्यांकडूनच विधिमंडळात दिलेल्या आश्‍वासनाची अद्याप पूर्तता नाही!

The moratorium on the work of 'Chhatrapati Shivaji Maharaj' at entrance at Aarey Check Naka has not been lifted yet! | अद्याप आरे चेक नाक्यावरील ‘छत्रपती शिवाजी महाराज’ प्रवेशद्वाराच्या कामावरील स्थगिती उठवलीच नाही!

अद्याप आरे चेक नाक्यावरील ‘छत्रपती शिवाजी महाराज’ प्रवेशद्वाराच्या कामावरील स्थगिती उठवलीच नाही!

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर आपल्या मर्जीतल्या लोकप्रतिनिधींना सोडून अन्य पक्षांतील लोकप्रतिनिधींच्या जनहितार्थ कामांना मंजुर देण्यासाठी चालढकल सुरू आहे. दस्तुरखुद्द संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनीच १५ दिवसांमध्ये स्थगिती उठविण्याचे विधिमंडळात आश्‍वासन देऊनही अद्याप त्याची पूर्तता करण्यात न आल्याने सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या  ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या नावे आरे चेक नाका उभारण्यात येणार्‍या भव्य प्रवेशद्वाराचे काम रखडले आहे. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या आश्‍वासनाची आठवण करुन त्याची पुर्तता करण्यासाठी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी पर्यटनमंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री यांना पत्र पाठवले आहे. 

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणार्‍या गोरेगाव चेक नाक्यावर जनतेच्या मागणीनुसार आमदार निधीतून ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या नावे भव्य प्रवेशद्वार व स्टार शौचालय उभारण्यासाठी जिल्हा नियोजन विभागाला आमदार रविंद्र वायकर यांनी पत्र दिले. या दोन्ही वास्तु उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत ३१ मार्च २०२२ रोजी मंजुरी दिली. परंतु राज्यात नविन सरकार स्थापन झाले आणि सुरू असलेली कामे सोडून अन्य कामांना स्थागिती देण्यात आली. त्यामुळे जनहितार्थ उभारण्यात येणारी कामे वर्षभर रखडली आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून जोगेश्‍वरी विधानसभा मंजुर करण्यात आलेल्या रुपये २ कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली. यात स्थगितीमुळे वरील दोन्ही वास्तुंचे काम रखडले आहे असा आरोप वायकर यांनी केला.

शासनाने दिलेल्या स्थगितीमुळे रखडलेली कामे सुरू व्हावीत यासाठी आमदार वायकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून याप्रश्‍नी सभागृहाचे लक्ष वेधले. ही स्थगिती कधी उठविण्यात येईल? असा प्रश्‍न ही उपस्थित केला होता. याला उत्तर देताना पर्यटन मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री यांनी स्थगिती देण्यात आलेल्या रुपये २ कोटीं कामांच्या निधीचा उपयोग कसा करता येईल या संबंधी १५ दिवसांमध्ये निर्णय करण्यात येईल, असे आश्‍वासन सभागृहात दिले होते. तर पशु व दुग्धविकास मंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आराध्य दैवत असल्याने राज्य सरकार यात स्वत: लक्ष घालून ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या नावाने जी कमान उभारण्यात येत आहे ते साजेस काम करण्या संदर्भात राज्य सरकार पुढाकार घेईल. या कामांसाठी ज्या ज्या विभागाच्या परवानगीची आवश्यकता असेल त्यासाठी राज्य सरकार लक्ष घालून काम करतील, असे आश्‍वासन सभागृहात दिले होते. 

मात्र हे आश्‍वासन देऊन आत दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी या दोन्ही कामांवरील स्थगिती उठविण्यात आली नसल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाकडून देण्यात आल्याने आमदार वायकर यांनी मंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची  पुर्तता करण्यासाठी पर्यटन मंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री यांना पत्र पाठवून आठवण करुन दिली आहे.

 ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या नावाने उभारण्यात येणार्‍या प्रवेशद्वाराला खिळ घालण्यामागे सरकारचा हेतू काय आहे? हे काम रोखून शासनाला काय साध्य करायचे आहे? असा सवाल त्यांनी केला. आता दोन महिने झाले तरी या कामांवरील स्थगिती उठविण्यात येत नसेल तर दाद तरी कुणाकडे मागायची? असे प्रश्‍नही वायकर यांनी पाठविलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.  

Web Title: The moratorium on the work of 'Chhatrapati Shivaji Maharaj' at entrance at Aarey Check Naka has not been lifted yet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Aarey Coloneyआरे