अवघ्या ११ महिन्यांच्या तान्हुल्याला आईने दिले यकृत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 06:18 AM2022-10-19T06:18:27+5:302022-10-19T06:19:29+5:30
प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया यशस्वी
मुंबई : लहान मुलांना आनुवंशिक आजारांमुळे काही वेळा त्याच्यावरसुद्धा अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. या अशाच प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे ११ महिन्यांच्या मुलावर डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली आहे. त्या मुलाच्या आईनेच त्याला यकृताचा तुकडा दिला. तो आज पूर्णपणे बरा झाला असून, सर्वसामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांत अपोलो रुग्णालयात लहान मुलाच्या ५३ यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आलेली मुले आणि त्यांचे पालक या कार्यक्रमात उपस्थित होते. यामध्ये बहुतांश वेळा मुलांना त्यांच्या आईंनीच यकृत दान केल्याचे समोर आले आहे. ज्या ५३ बालकांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली त्यांना यकृताशी संबंधित व्याधी अगदी लहान वयातच आढळली होती.
कल्याणला राहणाऱ्या वृषाली वर्मा यांच्या मुलाला तीन महिन्यांतच डॉक्टरांनी बिलरी अटरेजिया हा यकृताचा आजार असल्याचे निदान केले होते. या आजारात यकृतात तयार होणारा पित्तरस पित्त नलिकेद्वारे पित्ताशयाच्या पिशवीकडे नेला जातो. पित्ताशयात काही दोष निर्माण झाल्यास ही नलिका आंकुचन पावून खराब होते. या अशा रुग्णांना उपचार केल्यानंतर काही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला.
वृषाली वर्मा यांनी सांगितले की, ‘माझ्या मुलाची तब्येत लहानपानपासूनच खराब होती. तीन महिन्यांचा असताना त्याला यकृत प्रत्यारोपण करावे लागेल, असे सांगितले होते. ११ महिन्यांचा असताना त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. ज्यावेळी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यावेळी त्याचे वजन २ किलो ८०० ग्रॅम होते. अत्यंत बिकट परिस्थितीत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. आभा नागराल आणि त्याच्या सर्व सहकार्याची खूप मदत झाली.’
वैद्यकीय टीमचा विस्तार
याप्रकणी अपोलो हॉस्पिटलच्या पश्चिम क्षेत्राचे प्रादेशिक सीईओ संतोष मराठे म्हणाले, ‘प्रत्यारोपण कार्यक्रमाचे नेतृत्व कुशल आणि अनुभवी डॉक्टरांची टीम आमच्याकडे आहे. प्रत्यारोपणासोबतच अवयव दान जनजागृती करण्यासाठी मोहीम आयोजित करत असतो. वैद्यकीय टीमचा विस्तार झाल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. मरिन लाइन्स येथील बॉम्बे हॉस्पिटलसोबतसुद्धा आम्ही एकत्रितपणे येऊन या विषयावर काम करणार आहोत.’