मुंबई : जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा कार्यकर्ते आझाद मैदानात दाखल होत आहेत. गुरुवारी संध्याकाळपर्यंत मुंबई बाहेरील दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र त्यांना संध्याकाळी मैदानाबाहेर जाण्याच्या सूचना आझाद मैदान पोलिसांनी दिल्या. तरीही कार्यकर्त्यांकडून उपोषणासाठी व्यासपीठाची उभारणी सुरू आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी जरांगे पाटील दोन कोटी मराठा समाजासह उद्या प्रजासत्ताक दिनी मुंबईत दाखल होत आहेत. मात्र पोलिसांनी परवानगी दिली नसल्यामुळे मुंबईच्या वेशीवरच जरांगेना रोखण्यासाठीपोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जरांगेना पाठिंबा देण्यासाठी गावागावातून मराठा समाज एसटी, रेल्वे मिळेल त्या मार्गाने आझाद मैदानाकडे निघाले आहेत. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात मराठा समाजाच्या हालचाली वाढल्या आहेत.
पोलिसांची परवानगी नसताना सुद्धा मुंबईतील मराठा कार्यकर्त्यांनी मैदानात उपोषण आणि सभेसाठी व्यासपीठ उभारण्यास सुरुवात केली आहे तसेच पाणी आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यामुळे पोलिसांची ही धावपळ वाढली आहे.