मुंबई - जानेवारी-फेब्रुवारीत थंडावलेल्या मराठी सिनेसृष्टीत मार्चमध्ये सुरुवातीच्या दोन आठवड्यांमध्ये नऊ चित्रपट प्रदर्शित झाले. तिसऱ्या आठवड्यात पुन्हा मराठी चित्रपट थंडावले असून, पाच हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात तब्बल १३ आणि दुसऱ्या आठवड्यात नऊ चित्रपट प्रदर्शित झाले होते. तिसऱ्या आठवड्यातील चित्र मात्र खूपच भिन्न आहे. बहुप्रतीक्षीत 'योद्धा'च्या जोडीने 'बस्तर', 'गिन के दस' आणि 'अल्फा बीटा गामा' असे एकूण चार चित्रपट या आठवड्यात बॅाक्स आॅफिसवर हजेरी लावणार आहेत. याखेरीज 'मर्डर मुबारक' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'कुंग फू पांडा ४' हा 'कुंग फू पांडा' चित्रपटांच्या सिरीजमधील आगामी चित्रपटही लक्ष वेधणार आहे. भूषण प्रधान व शिवानी सुर्वे यांचा 'ऊन सावली' आणि नागेश भोसले अभिनीत 'दंगा' हे दोन मराठी चित्रपट अत्यंत कमी सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहेत. दोन्ही चित्रपटांची फारशी पब्लिसिटी केली गेली नसल्याने कुठेही हवा नाही. शालान्त परीक्षा सुरू असल्याने या आठवड्यात फार मोठे सिनेमे रिलीज होणार नसल्याचे चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रथम दहावी-बारावीच्या परीक्षा आणि त्या मागोमाग येणाऱ्या शालांत परीक्षांमुळे मार्च महिन्यात फार सिनेमे रिलीज होत नाहीत, पण दर वर्षाच्या तुलनेत यंदा मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये बरेच चित्रपट आले आहेत.
या आठवड्यात मात्र पुन्हा नवीन सिनेमांना ब्रेक लागला आहे. करण जोहरची निर्मिती असलेला सागर आंब्रे-पुष्कर ओझा या दिग्दर्शक द्वयींचा 'योद्धा' बऱ्याच तारखा बदलल्यानंतर अखेर या आठवड्यात रिलीज होणार आहे. यात सिद्धार्थ मल्होत्राच्या जोडीला राशी खन्ना आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. 'द केरल स्टोरी' फेम अदा शर्माच्या 'बस्तर - द नक्सल स्टोरी'चीही उत्सुकता आहे. सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रायमा सेनही आहे. सारीश सुधाकरन दिग्दर्शित 'गिन के दस' या चित्रपटासोबतच 'अल्फा बीटा गामा'मध्येही अनोळखी चेहरे आहेत. घोषणेपासूनच चर्चेत असलेला होमी अदजानियांचा 'मर्डर मुबारक' ओटीटीवर आला आहे. सारा अली खान, विजय वर्मा, पंकज त्रिपाठी, करिष्मा कपूर, संजय कपूर, डिंपल कपाडीया अशी मोठी स्टारकास्ट यात आहे.