लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबईतील सर्व मॅनहोलना संरक्षक जाळ्या बसविण्यासंदर्भात कृती आराखडा पालिका प्रशासनकडून तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी अभियंते येत्या पंधरा दिवसात स्वतंत्र प्रतिकृती (प्रोटोटाइप) विकसित करणार आहेत. ही प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून त्यानंतर मुंबई पालिका क्षेत्रात मॅनहोलवर जाळी बसविण्याचे काम वेळेत पूर्ण करण्यात येणार असून, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मॅनहोल सुरक्षित केले जातील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
पालिका क्षेत्रातील मॅनहोल उघडे राहू नयेत, पर्यायाने दुर्घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना आखाव्यात, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रशासनाला मॅनहोल सर्वेक्षणासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. मॅनहोल आणि चेंबरच्या ठिकाणी सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीला पायाभूत सुविधा विभागाचे उपायुक्त उल्हास महाले, विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त चक्रधर कांडलकर, पर्जन्य जलवाहिन्यांचे प्रमुख अभियंता राजू जहागिरदार, जलअभियंता चंद्रकांत मेतकर, मल:निसारण प्रकल्पाचे प्रमुख अभियंता सतीश चव्हाण यांच्यासह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.
गुणवत्तापूर्वक काम हवे
- पावसाळ्यात मॅनहोल्सच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संरक्षक जाळ्या बसविण्यासोबतच अद्ययावत तंत्रज्ञानाविषयी या बैठकीत सांगोपांग चर्चा करण्यात आली.
- मुंबईकरांसाठी परवडणारी स्वस्त आणि मजबूत यंत्रणा उभारण्याच्या पर्यायांवर या बैठकीत चर्चा झाली.
- पालिकेच्या उपलब्ध अभियंत्यांकडून व्यवहार्य अशी प्रतिकृती (प्रोटोटाइप) विकसित करावी, मॅनहोल संदर्भातील पालिकेची प्रशासकीय कार्यवाही उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार मुदतीत, गुणवत्तापूर्ण व परवडेल अशा किमतीमध्ये करण्याचे निर्देश वेलरासू यांनी दिले.