कृत्रिम पावसासाठी पालिका आठवड्यात काढणार निविदा; दिल्लीतील प्रयोगाकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 11:45 AM2023-11-18T11:45:31+5:302023-11-18T11:46:00+5:30
पाणीप्रश्न सुटणार
मुंबई : वाढत्या प्रदूषणावर कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे अखेर महापालिकेकडून निश्चित करण्यात आला आहे. येत्या आठवड्याभरात यासंबंधी निविदा काढण्यात येणार असून, यासाठी एजन्सी निश्चित करण्यात येणार आहे. ही एजन्सी कृत्रिम पावसासाठी आवश्यक वातावरण, वेळ, ठिकाण यांची निश्चिती करून प्रयोगाची अंमलबजावणी करील.
दिल्लीनंतर मुंबईत ‘क्लाउड सीडिंग’ म्हणजेच कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला तर प्रदूषणाची पातळी नियंत्रणात ठेवण्यास आपल्याला मदतच होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.निविदा प्रक्रियेसाठी अर्ज करणारी एजन्सीही या तंत्रज्ञानातील पारंगत अशीच असेल, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
टॅंकरवरचा खर्च वाचवता येणार
दिल्लीतील धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबईतही कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार असून, त्यामुळे धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेला पाण्याच्या टॅंकरवर येत असलेला खर्च वाचवता येणार आहे. त्यामुळे पालिका कृत्रिम पावसाची चाचपणी करील असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आता त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
दुबईस्थित प्रयोगाची माहिती घेणार
दुबईमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग होत असतात. टाय पार्श्वभूमीवर तेथील तज्ज्ञांशी आपले प्रशासन व अधिकारी योग्य ती सल्लामसलत करतील, अशी माहिती ही शिंदे यांनी दिली. तेथील प्रयोगाचा अभ्यास हा येथील प्रयोगासाठी दिशादर्शक ठरू शकेल, असे त्यांनी म्हटले.