मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या शिवडी - न्हावा शेवा म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम बऱ्यापैकी पूर्ण होत आले असून, या पुलावरील ७० ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेक स्पॅन पैकी केवळ शेवटचे ३ डेक बसविणे बाकी आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत तिन्हीही डेक बसविण्यात आल्यानंतर हा पूल पूर्णपणे जोडला जाणार आहे. शिवडी इंटरचेंजचे कामही मे महिन्याच्या शेवटी पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा सागरी सेतू आणखी एक मैलाचा दगड गाठणार आहे.
फ्लेमिंगो कुठे जाणार नाहीत शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबईतून नवी मुंबईत १५ मिनिटांत पोहोचता येणार आहे. याठिकाणी ग्रोथ सेंटर, लॉजिस्टिक पार्क, टाउनशिप, टेक्नो हब, फार्मा हब बनविण्यात येणार आहे. या ठिकाणचे फ्लेमिंगो इथेच राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन मुंबई महानगर प्रदेशांतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसाठी फास्टॅग व्यवहार संपादन, टॅग जारी करणे आणि इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन एकत्रीकरण सेवांसाठी बँकिंग भागीदाराची निवड करण्याकरिता एमएमआरडीएने गुरुवारी ई-निविदा सूचना जारी केल्या आहेत.
जहाजांची सुरक्षितता समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे हे स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे २५ मीटर उंच बांधण्यात येत आहेत.
कुठे कुठे जोडणार? ट्रान्स हार्बर लिंक चिर्ले गावाजवळून मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाला जोडणार. लिंक इस्टर्न फ्री वे ला जोडणार असल्याने थेट रायगडच्या दिशेने प्रवास शक्य. वरळी कोस्टल रोडही शिवडी वरळी कनेक्टरमार्गे हा प्रकल्प जोडण्यात येणार आहे.