Join us  

महापालिकेच्या दिनदर्शिकेने खुलवले मुंबईचे सौंदर्य!, गेट वे ऑफ इंडिया, सीएसएमटीचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 7:54 AM

गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मंत्रालय या व्यतिरिक्त अनेक स्थळांचा अंतर्भाव या दिनदर्शिकेत करण्यात आला आहे.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत अनेक ब्रिटिशकालीन वास्तू आहेत. या वास्तूंमुळे मुंबईची वेगळीच ओळख निर्माण झाली असून, महापालिकेच्या तसेच सरकारच्या माध्यमातून या वास्तूंचे  जतन केले जात आहे. पालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या आकर्षक रोषणाईमुळे तर या वास्तू आणखीनच उजळून दिसतात. याच वास्तूंचे छायाचित्र मुंबई महापालिकेच्या दिनदर्शिकेवर प्रदर्शित करण्यात आले असून, या छायाचित्रातून मुंबईचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मंत्रालय या व्यतिरिक्त अनेक स्थळांचा अंतर्भाव या दिनदर्शिकेत करण्यात आला आहे.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी  पालिका क्षेत्रातील ऐतिहासिक इमारती व विविध ठिकाणी आकर्षक रोषणाई केली होती. या  आकर्षक छायाचित्रांनी यंदाच्या दिनदर्शिकेचे प्रत्येक पान सजवण्यात आले आहे. ही दिनदर्शिका त्यामुळे लक्ष वेधून घेत आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशिष शर्मा, सहआयुक्त  संजोग कबरे, सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे, महानगरपालिका मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुधीर तळेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

‘ही’ आहेत लक्षवेधी छायाचित्रेमुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय, गेट वे ऑफ इंडिया, मंत्रालय, भारतीय आयुर्विमा महामंडळ मुख्यालय, दादर येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाची इमारत, माहिम चौपाटी येथील निरीक्षण मनोरा, दक्षिण मुंबईतील महानगरपालिकेचे सेठ आत्मासिंह जेठसिंह बांकेबिहारी कान-नाक-घसा रुग्णालय, नेताजी सुभाष मार्ग (मरिन ड्राइव्ह), हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारक आणि दादर येथील चैत्यभूमी परिसराचे प्रवेशद्वार या ठिकाणांच्या छायाचित्रांचा समावेश आहे.

भायखळ्यात छपाईदिनदर्शिकेचे मुद्रण हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच भायखळा येथील मुद्रणालयातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या आधारे करण्यात आले आहे. या प्रकाशनांसाठीची सर्व कार्यवाही ही महानगरपालिकेच्या अंतर्गत स्तरावरच करण्यात आली आहे. त्यामुळे दिनदर्शिकांची छपाई उत्तम झाली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका