Join us

पावसाळ्यात यंदाही मुंबई तुंबणार ? नाल्यातून ९९ टक्के गाळ काढल्याचा मनपाचा दावा 

By सीमा महांगडे | Updated: May 24, 2024 09:46 IST

आतापर्यंत नाल्यातून ९९ टक्के गाळ काढल्याचे दावे पालिकेने केले असले तरी, नाल्यांचे प्रवाह अजून गाळाने भरलेले आहेत.

सीमा महांगडे, मुंबई : पावसाळ्यात पाणी साचून मुंबई जलमय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली तरी शहरात दिसणारी परिस्थिती पाहता यंदा पुन्हा एकदा मुंबई तुंबणार हे स्पष्ट आहे.

आतापर्यंत नाल्यातून ९९ टक्के गाळ काढल्याचे दावे पालिकेने केले  असले तरी, नाल्यांचे प्रवाह अजून गाळाने भरलेले आहेत. नालेसफाई केल्यानंतर त्यात दररोज पडणारा कचरा तरंगतच आहे. यासाठी पालिकेवर प्रचंड टीका होत असून, पावसाळा सुरू होण्याच्या आधी नियोजन करून पूर्णपणे नालेसफाई करावी यासाठी पालिकेवर दबाव येत आहे.

मुंबई शहर, उपनगरांतील लहान-मोठे नाले, द्रुतगती महामार्गालगतच्या नाल्यांची सफाई तसेच मिठी नदीतील गाळ उपसण्याचे कंत्राट ३१ कंत्राटदारांना दिले आहे. त्यासाठी पालिका एकूण २४९.२७ कोटी रुपये खर्च करणार आहे. कंत्राटदारांना ३१ मेपूर्वी १० लाख २२ हजार १३१ मेट्रिक टन गाळ उपसा करावा लागणार आहे. 

नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या, पाणी निचरा होण्याची ठिकाणे अनेकदा माती, घाण, कचरा, गाळ यांनी भरल्याचे प्रकार घडतात. छोटे नाले व रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांतून सांडपाणी आणि काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो. मात्र छोट्या नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटीच्या भागांत येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो. मिठी नदीतून आतापर्यंत ९९.३६ टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

कंत्राटदारांना दंड-

१) यंदा पावसाळापूर्व नाले सफाईसाठी पालिका विशेष काळजी घेत असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेकडून आर्थिक दंडही केला जात आहे.

२) गाळ काढण्याच्या कामात निष्काळजी करणाऱ्या कंत्राटदारांवर आतापर्यंत एकूण ३० लाख ८३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका