मुंबई : १ मार्च ते ३१ मार्च २०२४ या एकाच महिन्यात तब्बल २ हजार ४२५ कोटी रूपयांचा महसूल गोळा करत मुंबई महापालिकेने विक्रमी कामगिरी केली. असून पालिकेच्या इतिहासातील मार्च महिन्यातील मालमत्ताकर वसुलीची ही उच्चांकी रक्कम आहे. तसेच कर महसुलात कोणत्याही प्रकारची घट अथवा तूट आली असे म्हणणे योग्य ठरत नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.
२०२३-२४ मध्ये पाठवण्यात आलेल्या सुधारित कर देयकांचा भरणा करण्याची मुदत २५ मे २०२४ आहे. अनेक मालमत्ताधारकांनी त्यापूर्वी कर भरण्याचे आश्वासित केले आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे २०२४ मध्ये संकलित होणारा मालमत्ता कर हा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील उद्दिष्टांचाच भाग असेल. त्यामुळे कर महसुलात कोणत्याही प्रकारची घट अथवा तूट आली असे म्हणणे योग्य ठरत नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.
पालिका हद्दीत एकूण ९ लाख ५५ हजार ३८ मालमत्ता आहेत. त्यापैकी ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱया निवासी इमारती / निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. या मालमत्तांची संख्या ३ लाख ५६ हजार ६५२ आहे. एकंदरीतच ५ लाख ९८ हजार ३८६ मालमत्ताकर आकारणी कक्षात येतात. सन २०२३-२४ मध्ये २ लाख ५३ हजार ६०५ मालमत्ताधारकांनी मिळून ३ हजार १९७ कोटी ३३ लाख रूपयांचा कर भरणा केला आहे. उर्वरित ३ लाख ४४ हजार ७८१ मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरणा केलेला नाही. त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे, असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. त्याचबरोबर मालमत्ताकर संकलाचे निश्चित केलेले सुधारित उद्दिष्ट २५ मे २०२४ पर्यंत गाठण्यात यश येईल, असा विश्वास व्यक्त केला.
१ मार्च ते ३१ मार्च या एक महिन्यातील मालमत्ताकर संकलनाची गत तीन वर्षांची तुलनात्मक आकडेवारी पालिकेने जाहीर केली आहे.
सन २०२०-२१ : ७३० कोटी रूपये२०२१-२२ : १ हजार ३८८ कोटी रूपये२०२२-२३ : १ हजार १७९ कोटी रूपयेसन २०२३-२४ : २ हजार ४२५ कोटी रूपये