फिक्स डिपॉझिटमधून पालिकेने एक वर्षात ६ हजार कोटी केले खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 09:11 AM2023-08-08T09:11:02+5:302023-08-08T09:11:22+5:30
कर्ज काढून सण साजरा करण्याचा पालिकेचा दिवाळखोरी डाव : विरोधक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये मागील एका वर्षात तब्बल ६ हजार २४० कोटींची घट दिसून आली आहे. १ जून २०२२ रोजी महापालिकेच्या मुदत ठेवी ९२ हजार ६८७ कोटी रुपये इतक्या होत्या त्या आता ८६ हजार ४४६ कोटींवर आल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे. पालिकेकडून जवळपास २ हजार कोटींच्या ठेवी एमएसआरडीसीला तर बेस्टला २ हजार ६८९ कोटी हस्तांतरित केले आहेत. दरम्यान, कर्ज काढून सण साजरा करण्याचा हा डाव असून पालिकेवर येऊ घातलेल्या आर्थिक संकटाची ही नांदी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
पालिकेच्या विविध बँकांत जून २०१७ पर्यंत ६४ हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यात वाढ होऊन त्या ६४ हजार ७४१ कोटी ९२ लाख रुपयांवर पोहोचल्या होत्या. त्यावेळी पालिकेला किमान ५.९५ टक्के ते ६.७५ टक्के इतके दरसाल व्याज मिळत होते. मात्र, नंतर व्याज दरात घसरण होत गेली. मार्च २०१८ पर्यंत पालिकेच्या विविध बँकांत ६९ हजार १३५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या; तर ३० जून २०१९ पर्यंत त्यात मोठी वाढ होऊन रक्कम ७९ हजार ९१ कोटी ४६ लाख रुपयांवर गेली होती. त्यानंतर पालिकेला मोठा महसूल प्राप्त होऊन जून २०२२ मध्ये ही रक्कम ९२ हजार कोटींपर्यंत पोहोचली होती.
...तर मुदत ठेवींचा आकडा आणखी कमी होणार
महापालिकेने हाती घेतलेल्या ३१ प्रकल्प कामांसाठी एकूण ९० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार आगामी वर्षांकरिता १७९४२.९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राखीव निधीमध्ये ५५ हजार ८०७ कोटी रुपये आहेत. हा पैसा प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे. मुदत ठेवींची संख्या अधिक वाटत असली, तरी हा आकडा भविष्यात आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
सगळ्यात श्रीमंत महापालिका असूनही आगामी आर्थिक संकटाची ही नांदी आहे. महापालिकेकडून मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे व त्याची कामेही सुरू आहेत. हा खर्च मुदत ठेवींमधून भागवण्याशिवाय पर्याय नाही हेच दिसते. महापालिकेला भविष्यात मोठ्या आर्थिक तुटीचा सामना करावा लागणार आहे हे स्पष्ट आहे.
- रवी राजा, माजी विरोधी पक्ष नेता, काँग्रेस