लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पर्यावरणाला घातक असणाऱ्या प्लास्टीक विरोधातील मोहीम सोमवारपासून आणखी तीव्र करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. त्यासाठी प्रत्येक वॉर्डात पाच जणांचे पथक कामाला लावले. मात्र, असे असतानाही मुंबईतील विविध बाजारात सर्रास प्लास्टीक पिशव्यांचा वापर होत आहे. दरम्यान, हे पथक नेमल्यानंतर पालिकेने एका दिवसात ८७ किलो प्लास्टिक जप्त केले असून २ लाख ९५ हजारांचा दंड वसूल केला आहे.
सरकारच्या महाराष्ट्र प्लास्टीक व थर्मोकोल अधिसूचना, २०१८ नुसार एकल वापराच्या प्लास्टिक वस्तू उत्पादन, वापर, वाहतूक, वितरण, घाऊक, किरकोळ विक्री आणि साठवणूक यावर बंदी घातलेली आहे, तसेच केंद्र शासनाने सिंगल युज प्लास्टिक अधिसूचना २०२१ नुसार प्लास्टिक उत्पादन, उपयोग, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवण यावर बंदी आहे. असे असतानाही मुंबईत सर्रास प्लास्टीक वापरले जाते. यावर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस यांच्यासह पाच जणांचे पथक स्थापन केले असू शकते प्रत्येक प्रभागात ही पथके दुकाने, मॉल आणि बाजारपेठांमध्ये धडक देणार असून प्लास्टीक जप्त करणार आहेत. खरेच कारवाई सुरू राहणार का असा सवाल विचारला जात आहे.
येथे सर्रास वापर
- कुर्ला स्थानक परिसर, दादर मार्केट, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, भायखळा येथे सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना आढळून आले.
- दूध डेअरी, फेरीवाले, किराणा दुकानदार, फळ-भाजी मंडई या ठिकाणी असलेल्या विक्रेत्यांना या बंदीबाबत कोणतीही कल्पना न दिल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले. तसेच सोमवारी पालिकेचे पथक कारवाईसाठी आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
१ हजार १५९ आस्थापनांना भेटी
मुंबईतील विविध भागात या पथकांनी सोमवारी १ हजार १५९ आस्थापनांना भेटी दिल्या व ५९ प्रकरणात मिळून ८७.३६५ किलो प्लास्टिक जप्त केले. त्यात प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे एकूण २ लाख ९५ हजार इतका दंडही आकारला.
यावर बंदी
- सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स)- हॅण्डल असलेल्या व नसलेल्या (सर्व जाडीच्या)
- नॉन ओव्हन पॉलिप्रॉपिलीन बॅग्स - ६० ग्रॅम प्रति चौरस मीटर (जीएसएम) पेक्षा कमी वजन असलेल्या
- प्लास्टिक डिश, बाउल, कॅन्टेनर (डबे), प्लेट्स, कप, ग्लास, काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स) इत्यादी, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक भांडे व वाटी.