महापालिका म्हणते, खड्डे आम्ही बुजवायचे, पैसे तुम्ही कमवायचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 06:20 AM2023-09-04T06:20:35+5:302023-09-04T10:40:37+5:30

एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीला सुनावले

The municipality says, we used to fill the potholes, you used to earn money | महापालिका म्हणते, खड्डे आम्ही बुजवायचे, पैसे तुम्ही कमवायचे!

महापालिका म्हणते, खड्डे आम्ही बुजवायचे, पैसे तुम्ही कमवायचे!

googlenewsNext

- जयंत होवाळ

मुंबई : महामार्ग, उड्डाणपुलांची देखभाल, देखरेख आम्ही करायची... रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवायचे आम्ही... टीकाही आम्हीच झेलायची... महसूल मात्र तुमच्या तिजोरीत... आधी महसुलाचे बोला अन्यथा उड्डाणपुलांची जबाबदारी घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत मुंबई महापालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांना सुनावले आहे.

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि उड्डाणपुलांच्या मुद्द्यावर महापालिकेने या दोन्ही यंत्रणांना खडे बोल सुनावले आहेत. मागील काळात महामार्गाची देखभाल एमएमआरडीए करत होते, तर ५५ उड्डाणपुलांची जबाबदारी एमएसआरडीसीकडे होती. सर्वसामान्यांना ही बाब माहीत नसल्याने महामार्ग आणि उड्डाणपुलांवर खड्डे पडले किंवा ते खराब झाले तर टीकेचे घाव मात्र महापालिकेला सहन करावे लागायचे. त्यामुळे पालिकेची हकनाक बदनामी व्हायची. अखेर काही महिन्यांपूर्वी सरकारने महामार्ग आणि उड्डाणपूल पुन्हा महापालिकेच्या ताब्यात दिले. महामार्ग पालिकेने ताब्यात घेतले; परंतु उड्डाणपूल अजून ताब्यात घेतलेले नाहीत. आता महसुलाचा मुद्दा ही पालिकेपुढील नवी डोकेदुखी झाली आहे.

महापालिका आणि दोन यंत्रणांमध्ये रंगला कलगीतुरा, एमएमआरडीएचे मात्र मौन

महसुलाचा प्रश्न निकालात निघाला नसला तरी पावसाळ्यात पुलांवर पडलेले खड्डे पालिकाच बुजवत आहे. त्या खर्चाची बिले एमएसआरडीसीला पाठविली जात आहेत.  झालेला खर्च एमएसआरडीसी देईल, अशी पालिकेला अपेक्षा आहे. महसुलाच्या मुद्द्यावर पालिका आणि या दोन यंत्रणांमध्ये कलगीतुरा रंगल्याचा पार्श्वभूमीवर महामंडळ आणि एमएमआरडीएची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.  एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्याशीही अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

उड्डाणपुलांच्या देखभालीची जबाबदारी घ्या, असे एमएसआरडीसीने पालिकेला सांगितले आहे. मात्र, ही जबाबदारी घेण्यास पालिकेने साफ नकार दिला आहे. जोपर्यंत महसुलाचे प्रकरण निकालात निघत नाही, तोपर्यंत आम्ही उड्डाणपूल ताब्यात घेणार नाही, असे आम्ही एमएसआरडीसीला स्पष्टपणे कळवले आहे.    - पी. वेलारसू, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), मुंबई महापालिका

Web Title: The municipality says, we used to fill the potholes, you used to earn money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.