मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा बिल्डरांना इशारा, नियम उल्लंघन केल्यास बांधकाम सील!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 11:53 AM2024-11-28T11:53:17+5:302024-11-28T11:53:56+5:30
निवडणुकीचा धुरळा संपल्यानंतर आता पालिकेने प्रदूषण नियंत्रणाकडे लक्ष केंद्रित केले असून मुंबईतील ५ हजारांहून अधिक बांधकामांना यासंबंधित इशारा देण्यात आला आहे.
मुंबई :
निवडणुकीचा धुरळा संपल्यानंतर आता पालिकेने प्रदूषण नियंत्रणाकडे लक्ष केंद्रित केले असून मुंबईतील ५ हजारांहून अधिक बांधकामांना यासंबंधित इशारा देण्यात आला आहे. याबाबत पालिकेच्या २८ मार्गदर्शक सूचनांनुसार विकासकांनी केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांनी बांधकामस्थळांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी नियमांचे उल्लंघन आढळल्यास विकासकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर निर्धारित मुदतीत याबाबत उपाययोजना केली नाही, तर बांधकामस्थळ सील करून ‘काम बंद’ची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये प्रदूषणात वाढ झाली असून हवेची गुणवत्ता प्रचंड खालावल्याचे समोर आले आहे. या प्रदूषणाला बांधकामांमधून उडणारी धूळ प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याचे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत. त्यासोबत प्रदूषणाची इतर कारणे रोखण्यासाठी गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर रोजी एक नियमावली बंधनकारक करण्यात आली आहे. यामध्ये यंदा दोन नियमांची वाढ करण्यात आली असून मुंबईत बांधकामाच्या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी चूल पेटवणे आणि शेकोटी पेटवण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या कामातून परतलेला पालिकेचा कर्मचारी वर्ग पुन्हा सेवेत रुजू झाल्याने या कारवाईला वेग येणार आहे.
५ ठिकाणी एअर प्युरिफायर
- मुंबईतील महत्त्वाच्या जंक्शनवर वाहनांच्या मोठ्या प्रमाणामुळे प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे पालिकेने दहीसर चेक नाका, बीकेसी, जोगेश्वरी लिंक रोड, छेडा नगर चेंबूर, मुलुंड वेस्ट चेक नाका अशा पाच ठिकाणी एअर प्युरिफायर बसवण्यात आले आहेत.
- हे प्युरिफायर धूळ शोषून घेत शुद्ध हवा बाहेर सोडतात. मुंबईत हीच प्रणाली आणखी पाच महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. यासाठी ठिकाणे निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
अशी आहे नियमावली
- एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट आणि एक एकरपेक्षा कमी भूखंडावर किमान २५ फूट उंचीचे लोखंडी, पत्र्यांचे आच्छादन किंवा कपड्यांचे आच्छादन असावे.
- तुषार फवारणी (स्प्रिंकलर) यंत्रणा असावी. धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान चार ते पाच वेळा पाण्याची फवारणी करावी.
- प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही आवश्यक.