संतोष आंधळेमुंबई : देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी मुंबई महापालिका आता स्वत:चे वैद्यकीय अभिमत विद्यापीठ सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी विशेष सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, विद्यापीठासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रशासनाच्या मंजुरीनंतर पुढील परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या अखत्यारित चार वैद्यकीय आणि एक दंत अशी पाच महाविद्यालये आहेत.
महापालिकेच्या अखत्यारितील सर्व वैद्यकीय महाविद्यालये दर्जेदार असून, देशभरातील विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेण्यास इच्छुक असतात. काही महाविद्यालयांना शतकोत्तरी इतिहासही आहे. ही सर्व महाविद्यालये आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहेत. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाला विविध शासकीय संस्थांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. या कामासाठी नियुक्त केलेल्या सल्लागारांसोबत वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक अधिष्ठाता त्यांना मदत करत आहेत. ‘अभिमत’साठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राज्य वैद्यकीय शिक्षण विभाग, विद्यापीठ अनुदान आयोग आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच विद्यापीठाच्या या तयारीकरिता सल्लागार नियुक्त करण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार सल्लागार नियुक्त करण्यात आला असून, प्रस्ताव बनविण्याचे काम सुरू असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य) डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.
अभिमत दर्जा मिळाल्यानंतर काय? अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर राज्याच्या विद्यापीठाचे फारसे नियंत्रण राहत नाही. शैक्षणिक, प्रशासकीय नियंत्रणातून मुक्तता होते. तसेच परीक्षा विभागाचे नियंत्रण अभिमत विद्यापीठाकडे येते. संलग्नता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आणि अन्य परवानगी घेण्यासाठी वारंवार विद्यापीठाकडे जावे लागत नाही. विद्यार्थ्यांची नोंदणी, निकालपत्र, पदवी प्रमाणपत्र, पात्रता प्रमाणपत्र मिळण्यासाठी खूप वेळ लागतो. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर या जंजाळातून मुक्तता होते.
कॉलेज आणि विद्यार्थी संख्याटोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज (नायर रुग्णालय)पदवी (एम. बी. बी. एस.) - १५० पदव्युत्तर ( एम. डी. / एम. एस.) - १६० सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज (के. इ. एम. रुग्णालय)पदवी (एम. बी. बी. एस.) - २५० पदव्युत्तर ( एम. डी./ एम. एस.) - २७९ लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज (सायन रुग्णालय)पदवी (एम. बी. बी. एस.) - २०० पदव्युत्तर (एम. डी./एम. एस.)- १९० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज (कूपर रुग्णालय)पदवी (एम. बी. बी. एस.) -२००पदव्युत्तर (एम. डी. / एम. एस.) - ६० नायर डेंटल कॉलेजपदवी (बी. डी. एस.) - ७५ पदव्युत्तर (एम.डी एस.) - २४