बोरीवलीत पालिका उभारणार थीम पार्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 10:18 AM2023-10-23T10:18:32+5:302023-10-23T10:18:52+5:30
बोरीवलीच्या अनिल देसल रोड येथे उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर मुंबई पालिका थीम पार्क उभारणार आहे.
मुंबई :
बोरीवलीच्या अनिल देसल रोड येथे उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर मुंबई पालिका थीम पार्क उभारणार आहे. त्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, डिसेंबर महिन्यात पार्क उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
सध्या पालिकेने मुंबई सुशोभीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत विविध ठिकाणी रोषणाई, उड्डाणपुलांवर रोषणाई, उद्याने सुशोभीकरण, थीम पार्क, आदी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. १० हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या या थीम पार्कमध्ये विद्यार्थ्यांसाठी फलोत्पादन व वनस्पतींच्या नवीन प्रजातींचा परिचय करून देणे, कंपोस्ट खत तयार करणे, आदी उपक्रम राबवले जात आहेत. या पार्कची थीम ही शैक्षणिक राहणार असून, लहान मुलांसाठी खेळणी, जॉगिंग ट्रॅकची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पार्कमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती असतील, पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगही केले जाणार आहे. याच पाण्यातून पार्काला लागणाऱ्या पाण्याची गरज भागवली जाणार आहे.
क्रीडांगणाचे नूतनीकरण
थीम पार्काचे काम सुरू करताना मालाड पूर्वेकडील जनरल अरुणकुमार वैद्य क्रीडांगणाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्याचबरोबर मालाड पूर्वेकडील पारेख नगरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी उद्यान कात टाकणार आहे. याही उद्यानाचे नूतनीकरण होणार आहे. त्यासाठी ४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.