मुंबई : ज्येष्ठ नागरिक मुरलीधर नाईक (८५) यांची हत्या करणाऱ्या कृष्णा परिहार (२५) या केअरटेकरला धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग करत ताब्यात घेण्यात आले. गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या १२ तासांत अहमदाबाद रेल्वे स्थानकावरून त्याला पकडण्यात सांताक्रुझ पोलिसांना यश आले. कृष्णाने नाईक यांच्या गळ्यातील रुद्राक्ष असलेली सोनसाखळी तसेच मनगटातील घड्याळ चोरी करण्याच्या नादात त्यांना ठार मारल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी पाहिला 'द केरळ स्टोरी'; म्हणाले, सडक्या मेंदूतील सडक्या...
रविवारी रात्री मुरलीधर नाईक झोपले असताना कृष्णा त्यांची २० ग्रॅम सोन्याची रुद्राक्षची चेन चोरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याच वेळी नाईक जागे झाले. दोघांत भांडण झाले आणि कृष्णाने नाईक यांच्या तोंडावर टेप बांधून त्यांचे हात- पाय बांधत गळा आवळून त्यांची हत्या केली. नाईक कुटुंबाने जानेवारीमध्ये हेल्थ केअर ॲट होम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत केअरटेकरची नियुक्ती केली. १ मे रोजी आधीच्या केअरटेकरने गावी जाण्यास रजा घेतली. त्यामुळे कृष्णाला नेमले गेले. त्याची पोलिस पडताळणी करण्यात आली नव्हती. सांताक्रुझ पूर्वेकडील सेंट्रल अव्हेन्यू रोडवरच्या हेलेना अपार्टमेंटमध्ये नाईक दाम्पत्य राहात होते.
मी गावी जातोय...
कृष्णा सौराष्ट्र एक्स्प्रेस गाडीने सौराष्ट्र येथे गावी जात असल्याचे पोलिसांना त्याच्या भावाकडून समजले. बोरिवली रेल्वे स्थानकावरून रात्री ९:५४ वाजता त्याने सौराष्ट्र एक्स्प्रेस पकडली. सांताक्रुझ पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले. पोलिस उपायुक्त इन्चार्ज कृष्णकांत उपाध्याय व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या मार्गदर्शनात पीआय महेश बोलकोटगी, अमर पाटील, एपीआय प्रकाश लहाने आणि पथकाने त्याला ताब्यात घेतले.
एजन्सीची चौकशी
हेल्थ केअर ॲट होम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एजन्सीकडे मुंबईत सुमारे ३५ केअरटेकर कामावर असून, परिहार हा त्यापैकी एक होता. त्यामुळे अन्य लोकांची पोलिस पडताळणी झाली का याची पडताळत असल्याचे उपाध्याय म्हणाले. परिहारचे गुन्हेगारी रेकॉर्ड नाही.
लकी चेन ठरली जीवघेणी
नाईक यांच्या पत्नी उमा त्यांना नेहमी ही चेन का घालता? असे विचारायच्या. त्यावर ते तिला सांगत की ही जीएसबी कम्युनिटीची भाग्यवान साखळी आहे आणि त्यावर त्यांचा विश्वास आहे. त्याच लकी चेनसाठी घात झाल्याने कुटुंबीयांना धक्का बसला.