Join us

BDD चाळींचं नाव बदललं, आता बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी, शरद पवार नगर नावानं ओळखणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 5:49 PM

शहरातील बीडीडी चाळींचे नाव बदलण्याची जितेंद्र आव्हाडांची घोषणा

मुंबई – शहरातील बीडीडी चाळींचं नाव बदलण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात केली आहे. वरळीतील बीडीडी चाळीचे स्व. बाळासाहेब ठाकरे नगर, नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर नाव देण्यात आले अशी माहिती आव्हाडांनी दिली आहे. तर गोरेगाव येथील पुर्नविकास होत असलेल्या पत्राचाळीला यापुढे सिद्धार्थ नगर नावाने ओळखले जाईल असंही त्यांनी जाहीर केले आहे.

मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील इमारती १०० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. बीडीडी चाळीचा पुर्नविकास कार्यान्वित झालेला आहे. त्यामुळे कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरु होईल. मुंबईतील ५० वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या इमारतीचा पुर्नविकास, रखडलेले एसआरए प्रकल्प, मुंबईबाहेर एसआरए योजना लागू करणे,म्हाडाच्या जागांवर आलेले अतिक्रमण हटवणे, धारावी व बीडीडी चाळीचा पुर्नविकास या आणि अशा अनेक विषयांबाबत विधानसभा सभागृहात नियम २९३ अन्वये चर्चा करण्यात आली. या चर्चेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज उत्तर दिले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निवारा देणे हे म्हाडाचे काम असून त्यासोबतच सामाजिक जाणीवेतून देखील म्हाडा काम करत आहे. परळमधील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बॉम्बे डाईंग येथील इमारतीमधील १०० खोल्या कॅन्सरचे उपचार घेणाऱ्यांच्या नातेवाईंकासाठी दिल्या आहेत. तळीये गावात अतिवृष्टी झाली. त्यावेळीच तळीये गावाचा पुर्नविकास म्हाडा करेल असे जाहीर केले होते. जून २०२२ पर्यंत म्हाडा तळीये गावातील लोकांना ६०० फुटांचे घर देणार आहे. मुंबईतील जिजामातानगर येथे विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी एक नवे वसतीगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतलेला आहे. १९ मजल्यांची एक इमारत बांधण्यात येत आहे. ताडदेव येथे ३२ कोटी खर्च करुन ९२८ महिला राहू शकतील अशी इमारत बांधण्यात येत आहे. तसेच पालघर येथे २० एकरची जागा मिळाल्यास तिथे एक चांगले वृद्धाश्रम बांधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असंही त्यांनी सांगितले.

तसेच वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलशेजारी असलेल्या भूखंडावर जागतिक दर्जाचे वेटरनरी (पशूवैद्यकीय) हॉस्पिटल बांधण्यात येईल. जोगेश्वरी पश्चिम येथे म्हाडाच्या भूखंडावर मुंबईकरांसाठी एक जागतिक दर्जाचे हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. तसेच म्हाडा कार्यालयाच्या वांद्रे येथील इमारतीचा पुर्नविकास करुन आधुनिक दर्जाची इमारत बांधली जाणार आहे. मुंबईतील म्हाडाच्या जागा हडप करणाऱ्या बिल्डरांविरोधात महाविकास आघाडी सरकार कठोर कारवाई करेल. यासाठी जॉनी जोझेफ यांची समिती गठीत केली आहे. बिल्डरांनी घशात घातलेला म्हाडाचा भूखंड ताब्यात घेतला जाईल असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

टॅग्स :जितेंद्र आव्हाड