स्टेशनचं नाव राम मंदिर, पण पत्ता गोरेगावचा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 01:52 PM2023-10-09T13:52:35+5:302023-10-09T13:53:36+5:30
पश्चिम रेल्वेवर सात वर्षांपूर्वी राम मंदिर स्थानकाची निर्मिती झाली. परंतु या स्थानकाच्या निर्मितीची चर्चा त्याही आधी म्हणजे साधारणतः पाच दशकं चालली होती. या स्थानकाच्या नावामागे इतिहास आहे...
संजीव साबडे, मुक्त पत्रकार
सुमारे ५७-५८ वर्षांपूर्वीची गोष्ट. जोगेश्वरी आणि गोरेगाव या स्टेशनमध्ये खूपच जास्त अंतर असल्याने दोन्हीच्या मध्ये नवीन रेल्वे स्टेशन लवकरच सुरू होणार आहे, अशी चर्चा गोरेगावात सुरू झाली. गोरेगावच्या जोगेश्वरी टोकाकडे ओशिवरा नाला, त्यावर पूल होता.
ओशिवरा हे गाव असल्याचा उल्लेख फक्त महसूल खात्याच्या कागदोपत्री; पण तो भाग गोरेगावचा आहे, असाच सर्वांचा समज होता. त्यामुळे त्या दिशेला राहणारे सारे खुश झाले. नवं स्टेशन आपल्या घरापासून जवळ असेल हे त्या मागचं कारण. त्या स्टेशनचं नावं ओशिवरा असणार, हेही रेल्वे अधिकारी सांगत; पण ते बांधून पूर्ण झालं २०१६ साली आणि नाव दिलं गेलं राम मंदिर.
ओशिवरा येथून पूर्व पश्चिम जोडणारा जो उड्डाणपूल आहे, त्याला समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचं नावं देण्याचा ठराव शिवसेनेने मंजूर करून घेतला. या ओशिवऱ्याची ओळख म्हणजे स्मशानभूमी. ओशिवऱ्याला जातोय, असं कोणी म्हणालं की लगेच कोण वारलं, असा प्रश्न विचारला जाई. खूप वर्षांनी ओशिवरा हे गाव आताच्या अंधेरीत असल्याचं स्पष्ट झालं.
महिकावातीच्या बखरीत या राम मंदिराचा उल्लेख आहे; पण तेव्हा हा मालाड प्रांताचा भाग होता. ते मंदिर हमखास पाहावं. मंदिराचा मंडप, गर्भगृह आणि संपूर्ण परिसर मोठा आहे. गणेशोत्सवाच्या काळात या रस्त्यावरील तलावात विसर्जन केलं जाई.
या रोडच्या टोकाला रेल्वे फाटक होतं. त्याचं नावही ओशिवरा. फाटक ओलांडून गेलं की तबेले, म्हशी आणि त्यांना वैरण म्हणून गवताचे भारे. हा सारा उद्योग उत्तर भारतीयांच्या हाती. पश्चिमेच्या भागात इंडस्ट्री व काही लहान घरं. पुढे ४० वर्षांपूर्वी तिथं इमारती आल्या; पण वस्ती खूप वाढली नाही.
जवळ चॅम्पियन छत्री कारखाना होता, अवजड वाहनांसाठी एक वजन काटाही होता. तो आजही आहे. स्टेशन राम मंदिर असलं तरी तेथील लोक गोरेगाव हाच पत्ता सांगतात.
एकोणिसाव्या शतकात भिकोबा व हरिश्चंद्र गोरेगावकरांनी केला जीर्णोद्धार -
गोरेगावहून ओशिवराकडे जाताना डावीकडे एक रस्ता आजही लागतो. त्या रस्त्याचं नाव राम मंदिर रोड. त्या रस्त्यावर सारे औद्योगिक गाळे व छोटे कारखाने होते. तिथं नोकरी करणाऱ्यांखेरीज कोणी राम मंदिर रोडकडे वा मंदिरात फिरकत नसे. मात्र, कोणत्याही सणाला बायका व पुरुष या मंदिरातच जात. काही विद्यार्थी मंदिरात जाऊन अभ्यास करत. खूप शांत होता तेथील परिसर. ते राम मंदिर खूपच जुनं. एकोणीसाव्या शतकात (१८३५ साली) बांधलेलं आणि ते शतक संपताना भिकोबा व हरिश्चंद्र गोरेगावकरांनी त्याचा जीर्णोद्धार केला.