Join us

महाराष्ट्राला भिकेला लावण्याचं कंत्राट शिंदे-फडणवीस सरकारने घेतलंय का?; राष्ट्रवादीचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 11:28 AM

टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

मुंबई- वेदांता- फॉक्सकॉनपाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. त्यासाठी, पाठपुरावा सुरू असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच यापूर्वी म्हटलं होतं. मात्र, आता हाही प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीनेही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. वेदांता-फॉक्सकॉननंतर आणखी एक टाटा एअर बस निर्मितीचा २२ हजार कोटींची प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित...महाराष्ट्रद्रोही सरकार महाराष्ट्रातील युवकांचे अजून किती नुकसान करणार? यांनी महाराष्ट्र भिकेला लावायचं कंत्राट घेतलं आहे का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना याच महिन्यात पत्र लिहिले होते. हा प्रकल्प नागपूर परिसरातील टाटा समूहाच्या विस्तारित योजनांसाठी उपयोगी ठरेल, असेही पत्रात नमूद केले होते. गडकरींनी टाटा समूहाशी असलेल्या संबंधांचा हवाला देत मिहानला टाटा समूहाचा विकास हब बनविण्याची विनंतीही केली होती.

महाविकास आघाडीने काहीच केले नाही - फडणवीस

टाटा एअरबसचा प्रकल्प मिहानमध्ये उभारण्याच्या प्रस्तावाला हिरवा झेंडा मिळाला नव्हता. मात्र, आपण त्यासाठी बरेच प्रयत्न केले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकार