Join us

वाईन पिऊन गाडी चालविल्यास जवळचा बार की ‘बिहाइन्ड बार’? पोलीस म्हणाले, करू तुमचा ‘पाहुणचार’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 11:34 AM

Crime News: राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे.

मुंबई : राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे. राजकीय पक्षांमध्ये वाईन आणि दारूमध्ये ‘फरक स्पष्ट करा’ सुरू असतानाच मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हॅन्डलवर वाईन पिऊन गाडी चालविली तर पोलीस जवळचा बार दाखवणार की बिहाइन्ड बार (गजाआड) करणार, असा सवाल मुंबईकराने ट्वीट केला. त्यावर ब्रेथ ॲनालायझरमध्ये ‘तुम्ही प्यायलेल्या’ वाईनमध्ये दारू सापडली तर तुमचा आम्ही पाहुणचार करणार, असे गमतीदार उत्तर पोलिसांकडून देण्यात आले आहे.शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका खासगी न्यूज एजन्सीला माहिती देताना वाईन ही दारू नाही. वाईनची विक्री वाढली तर शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होईल आणि आम्ही त्यांच्या भल्यासाठी वाईन विक्री सुपर मार्केटमध्ये करण्याची परवानगी दिल्याचे म्हटले आहे. या एजन्सीच्या पोस्टला मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हॅन्डलवर टॅग करत ‘सो इफ आय ड्रिंक वाईन ॲन्ड ड्राईव्ह, विल @मुंबई पोलीस पुट मी बिहाइन्ड बार ओर शो मी निअरेस्ट बार?’ असा सवाल केला. त्यावर मुंबई पोलिसांनी रिट्वीट करत अशा परिस्थितीत तुम्ही जबाबदार नागरिकाप्रमाणे दुसरा चालक असलेल्या कार (कॅब)मध्ये प्रवास करा. कारण जर आमच्या ब्रेथ ॲनालायझरने तुम्ही प्यायलेल्या वाईनमधील दारूचा अंश पकडला तर आम्ही बिहाइन्ड बार तुमचा पाहुणचार करू असे उत्तर दिले.

टॅग्स :मुंबई पोलीसमुंबई