मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदास तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तीन पुस्तकांचे प्रकाशन सोमवारी राजभवनमध्ये आयोजित समारंभात करण्यात आले. राजभवन हे लोकाभिमुख असणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कोश्यारी यांनी यावेळी केले.या समारंभाला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य तसेच लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.महाराष्ट्र हे असंख्य प्रेरणास्थाने असलेले राज्य आहे. या भूमीने एकीकडे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशी संतांची मांदियाळी दिली आहे, तसेच दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे ओजस्वी नेते दिले आहेत. आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत असताना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीसाठी आपण काय करू शकतो याचा विचार करणे गरजेचे आहे. या दृष्टीने राजभवन अधिक लोकाभिमुख करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोश्यारी यांनी यावेळी केले. कोश्यारी यांच्याप्रमाणे अन्य राज्यपालांनीही कार्यअहवाल प्रकाशित करावेत, अशी सूचना राम नाईक यांनी केली. पद्मनाभ आचार्य यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी ‘लोकनेता भगतसिंह कोश्यारी’ या पुस्तकाचे लेखक रविकुमार आराक, भाषणांच्या संकलनकर्त्या डॉ. मेधा किरीट, चाणक्य प्रकाशन संस्थेचे डॉ. अमित जैन, माजी खासदार किरीट सोमैया, उद्योगपती अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, भरत दाभोळकर आदी उपस्थित होते.
या तीन पुस्तकांचे झाले प्रकाशन -कोश्यारी यांच्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरील तीन वर्षांच्या कार्यकाळावर आधारित ‘त्रैवार्षिक अहवाल’ हे कॉफी टेबल बूक, ‘लोकनेता भगतसिंह कोश्यारी’ हे चरित्रात्मक मराठी पुस्तक तसेच राज्यपालांच्या २७ निवडक भाषणाचे संकलन असलेले ‘राज्यपाल के रूप में भगत सिंह कोश्यारी के चुनिंदा भाषण’ हे हिंदी पुस्तक अशा तीन पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
कोश्यारी लोकांचे ‘लोकराज्यपाल’ - विजय दर्डाराज्यपाल अनेक आले, पण लोकांच्या मनातले राज्यपाल म्हणून तुम्ही कायम महाराष्ट्राच्या लक्षात राहाल. तुम्ही लोकांचे ‘लोकराज्यपाल’ आहात, अशा शब्दात विजय दर्डा यांनी राज्यपाल कोश्यारी यांचा गौरव केला. राजभवन हे आम जनतेसाठी कधीच खुले नव्हते. पण ते तुम्ही सगळ्यांसाठी खुले केले. तुम्ही शिवनेरी किल्ला चढून गेलात. ८० वर्षाचा तरुण हे करू शकतो, हे महाराष्ट्राने पाहिले, असे सांगून दर्डा पुढे म्हणाले की, तुम्ही महाराष्ट्रातील ३६ जिल्हे फिरून आलात. कोविड काळात तुम्ही जे काम केले त्याला तोड नाही. मराठी भाषेचे संवर्धन करण्याची सुरूवात तुम्ही तुमच्यापासून केली. तुम्ही राज्यपाल पदाची शपथ मराठीत घेतली. भाषा महत्त्वाची असते, त्यामुळे संस्कृती आणि सभ्यता कळते, हे तुम्ही दाखवून दिले, असेही दर्डा म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.