मुंबई-लोअर परेल येथे नव्याने होत असलेल्या उड्डाण पुलावर पदपथाची सोय केली नसल्याने गिरण गावात तीव्र नाराजी पसरली असून मुंबई मनपा आणि पश्चिम रेल्वेने सहानुभूतीपूर्वक विचार करून पूर्वी जसे जुन्या उड्डाण पुलाला पदपथ ,बस थांबे व उतरण्यासाठी जिने होते,तशी व्यवस्था पुन्हा करून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
डिलाईड रोड,करी रोड व लोअर परेल परिसरातील लोअर परेलचे जुने उड्डाण पूल तोडून नव्याने बांधले जात आहे.2018 साला पासून या नव्या उड्डाण पुलाचे काम सुरु आहे.त्याचे लवकर उदघाटन केले जाईल असे सांगितले जात आहे.परंतू नवा उड्डाणपूल बांधताना पादचाऱ्यांसाठी पदपथाची सोय केलेली दिसत नाही.उड्डाण पुलावर वाहतुकीसाठी सर्व सफाट रस्ता केलेला दिसत आहे,यामुळे परिसरात संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
दरम्यान नव्या पुलाला पदपथ बांधून द्यावेत, या मागणी साठी लोअर परेल परिसरातील गृहनिर्माण सोसायटी,चाळीतील रहिवाशी एकत्र येऊन संघटीत होत आहेत.त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यहार सुरु केला आहे.तसेच उड्डाण पुलाला पदपथ बांधून मिळावेत यासाठी करी रोड, डिलाईड परिसरातील मनसेचे पदाधिकारी मारुती दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनपाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
नव्या उड्डाण पुलांवर पदपथ बांधायचे नाहीत असं धोरण ठरलेले आहे, म्हणून लोअर परेलच्या उड्डाण पुलावर पदपथ बांधलेले नाहीत,अशी माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.या धोरणाला परिसरातीत स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला आहे.नवे पूल बांधताना मनपाने येथील नागरिकांची गरज काय आहे? याचा विचार करायला हवा होता,आमचे पूर्वीचे इंग्रजकालीनचे उड्डाण पूल खूप चांगले होते,अशी बोलकी प्रतिकिया सर्वत्र उमटत आहे.
लोकांना लोअर परळहुन करी रोड किंवा परतीचा पायी प्रवास करायचा असेल,त्यांची खूप मोठी अडचण होत आहे.कारण लोअर परेल रेल्वे स्टेशनवर चार वर्षांपूर्वी बांधलेले नवे पूल,खूप उंच आहे.चढताना सुदृढ माणसाची दमछाक होते.पूल चढून व नंतर पुढे उतरून करी रोड,डिलाईड रोडला चिंचोळी गल्लीतून पायी चालत जाणे किंवा परत येणे त्रासदायक ठरले आहे.अपंग,वृद्ध माणसे,गरोदर महिला,लहान मुले यांना त्या रेल्वेच्या पूलावर चढताना खूप अडचणीचे झालेले आहे.
लोअर परेल परिसरात रोज कामधंद्यासाठी चार ते पाच लाख नागरिक येत असतात.सकाळ आणि सायंकाळी मोठी गर्दी होते.उड्डाण पुलाला पदपथ नसतील तर त्यांनाही त्रासदायक ठरणार आहे.प्रचंड गर्दीमुळे भविष्यात या ठिकाणी अनुचित प्रकार घडू शकतो.एल्फिस्टन ब्रिज वर काही वर्षांपूर्वी चेंगरा चेंगरी होऊन प्रवासी मृत्यू मुखी पडले होते.याची आठवण नागरिक आजही करून देतात.